करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना देखील करनाची लागण झाली. दरम्यान उपचारासाठी त्यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना आता आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.

५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.