बॉलिवूडमध्ये प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘खाना’वळ आघाडीवर आहे. ‘खाना’वळीला मात देण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश २’ने केला होता. यावर्षी अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्‍स’ने गर्जना करत सलमान खानला मात दिली आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम रिटर्न्‍स’ने पहिल्याच दिवशी ३२.०९ कोटींची कमाई के ली आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘सिंघम रिटर्न्‍स’ने आघाडी घेतली आहे.
आमिर खानच्या ‘धूम ३’ने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशी ३६ कोटींची कमाई केली होती. त्यापाठोपाठ शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा क्रमांक लागतो. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने ३३.४ कोटींची कमाई के ली होती. सलमान खानच्या ‘एक था टायगर’चा या यादीत तिसरा क्रमांक होता. ‘एक था टायगर’ने ३२.९५ कोटींची कमाई केली होती. आघाडीच्या या पंक्तीत आजवर अजय देवगणचे नाव कु ठेच नव्हते. रोहित शेट्टीच्याच ‘सिंघम’ने अजय देवगणला १०० कोटींची कमाई करणारा नायक केले होते. आता त्याच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्‍स’ने अजयसाठी पुन्हा एकदा कोटीची किमया साधली आहे.
 स्वातंत्र्यदिन असल्याने ‘सिंघम रिटर्न्‍स’ला पहिल्या दिवशी फटका बसेल, अशी अटकळ होती. मात्र, चित्रपटासाठी संपूर्ण देशभरात ८५ ते ९० टक्क्यांच्या आसपास अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळाल्याने निर्माते आश्वस्त होते.
शुक्रवारी पहिल्याच दिवशी ३२.०९ कोटींची विक्रमी कमाई करीत अजय देवगणचा हा चित्रपट यंदाचा प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. यावर्षी ईदच्या निमित्ताने चार दिवस आधीच प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘किक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २६.५ कोटींची कमाई केली होती. अजयने सलमानला निदान या विक्रमापुरती तरी मात दिली आहे. कारण, सलमानच्या ‘किक’ने आत्तापर्यंत ३७२.५० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. ‘सिंघम रिटर्न्‍स’नेही ही किमया साधली तर अजय देवगणला ‘खाना’वळीत भेद करता येईल. ‘सिंघम रिटर्न्‍स’च्या कमाईचे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनीही स्वागत केले आहे.