आपल्याकडे दमदार पटकथा आहेत. आता फक्त नावाजलेल्या अभिनेत्रींशी करार झाला की लगेच धडाक्यात चित्रीकरणाला सुरुवात करायची, असे सगळे ‘अर्थ’पूर्ण आडाखे बांधून एक निर्माता तयार झाला. टॉपची अभिनेत्री म्हणून त्याने इकडचा-तिकडचा विचार न करता थेट क तरिना आणि दीपिकाच्या मॅनेजरना गाठले. मात्र, या दोघींनीही त्याला मानधनाचा जो आकडा सांगितला तो ऐकून त्याने ‘मोठा’ विचार सोडून देऊन चित्रपट करण्यावर भर द्यायचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांबरोबर काम करताना कतरिना आणि दीपिकासारख्या आघाडीच्या अभिनेत्री त्यांच्या तुलनेत फारच कमी मानधन घेतात. त्यावेळी एवढे कमी मानधन घेताना त्यांची अजिबात तक्रार नसते. कारण, त्यांचे सहकलाकारच चित्रपटाचे सहनिर्माते असतात. त्यामुळे, थोडे मानधन कमी मिळाले तरी चालेल, पण ‘खाना’वळीबरोबर काम करायची संधी सोडायची नाही, असा त्यांचा फंडा असतो. मात्र, एखाद्या छोटय़ा निर्मात्याबरोबर काम करायचे आहे आणि कोणताही मोठा अभिनेता जोडीला नसेल तर मात्र त्यांचा मानधनाचा आकडा अगदी दुप्पट होतो. संबंधित निर्मात्याने एका आघाडीच्या अभिनेत्रीला चित्रपटात घ्यायचे ठरवले होते आणि त्यासाठी त्याने थोडीथोडके  नव्हे तर १० कोटींचे मानधन देण्याची तयारी केली होती.
प्रत्यक्षात, कतरिना आणि दीपिका दोघींनीही १५ कोटी मिळणार असतील तरच चित्रपट करणार, असा पवित्रा घेतला. विविध पद्धतीने प्रयत्न करून पाहिले तरी दोघींपैकी एकीनेही माघार घेतली नाही. तेव्हा निर्मात्याने त्या दोघींचा विचारच सोडून दिला. त्याने आता आपल्या चित्रपटासाठी अलिया भट आणि श्रद्धा कपूर यांना विचार सुरू केला आहे. अलिया आणि श्रद्धा दोघीही आत्ताच्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. शिवाय, एकापाठोपाठ एक चार हिट चित्रपट देऊनही अलियाने आपले मानधन वाढवलेले नाही. त्यामुळे, अवाच्या सव्वा किंमत मोजून मोठय़ा अभिनेत्रींचे नखरे झेलण्यापेक्षा त्यांच्या मागच्या फळीतील अभिनेत्रींना घेऊन चित्रपट करणे छोटय़ा निर्मात्यांना जास्त फायदेशीर वाटते.