|| मानसी जोशी

‘अलग अलग’, ‘अपहरन’, ‘मुस्कान’ अशा मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते आयुब खान ‘रंजू की बेटिया’ या मालिकेत एका पारंपरिक विचारसरणीच्या गृहस्थाच्या भूमिके त दिसणार आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटातून आपले नशीब आजमावून पाहिलेल्या आयुब यांनी तिथे यश मिळत नाही हे स्पष्ट झाल्यावर छोटय़ा पडद्याकडे आपला मोर्चा वळवला होता. तिथे मात्र विविधांगी भूमिका आणि मालिकांमधून अभिनेता म्हणून तो स्थिरावला. आजही अभिनेता म्हणून त्याची छोटय़ा पडद्यावरची घोडदौड सुरू असली तरी सध्या कलाकार म्हणून मालिके च्या आशयाचाही विचार करावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट के ले.

‘आपल्या समाजात एक ल पालकांची उदाहरणे खूप सापडतात, मात्र समाजाच्या दृष्टीने ते अजूनही दुर्लक्षितच आहेत. मुलांचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणीपेक्षा त्यांना समाजाच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो हे या मालिके तून उत्कृष्टरीत्या मांडण्यात आले आहे. ग्रामीण भागात आजही अशी परिस्थिती दिसून येते आणि ही मालिका तेच वास्तव मांडण्याचा प्रयत्न करते आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम केल्यावर या वीस वर्षांत छोटय़ा पडद्यावरील तंत्रज्ञान, आशय तसेच कलाकारांना मिळणारे मानधन यात कमालीचा बदल झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. आधी तंत्रज्ञान प्रगत नसल्याने दृश्याचे चित्रीकरण केल्यावर त्यास संकलनासाठी जास्त वेळ लागत असे. आज एक ते दोन तासांत मालिकेचा एक भाग संकलन करून तयार असतो. मालिकेच्या आर्थिक गणितांनीही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. कलाकाराला चित्रपटसृष्टीत काम नसेल तर ते छोटय़ा पडद्याकडे वळतात. छोटय़ा पडद्याचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे. तो टिकवून ठेवण्याचे काम नवोदित कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांवर आहे. सध्या आशयनिर्मितीच्या बाबतीत छोटय़ा पडद्याला आणि चित्रपटांनाही तगडी स्पर्धा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मालिकाही ओटीटीवर जास्त पाहिल्या जात आहेत. आशयासाठी मिळणारे स्वातंत्र्य ही ओटीटी माध्यमाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. निर्माते – दिग्दर्शक सातत्याने नवीन कल्पनांवर काम करत असतात. आंतरराष्ट्रीय कलाकृतीही उपलब्ध असल्याने विविध विषय हाताळले जात आहेत, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

‘ टीव्ही पाहात नाही’

गेली कित्येक र्वष छोटय़ा पडद्यावर काम करणारा हा अभिनेता टीव्ही पाहात नाही. मालिकेत विविध भूमिका साकारत असलो तरीही टीव्हीवरील मालिका पाहण्यात मला रस नाही, असे त्यांनी सांगितले. यापेक्षा मी माझे आवडते काम करण्यास तसेच छंद जोपासण्यास प्राधान्य देतो. या टाळेबंदीमुळे घरात सर्व कामं केली. स्वयंपाक केला, मुलांचा अभ्यास घेतला, भांडी घासली तसेच स्वच्छता केली आणि बायकोला घराच्या कामात मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्षांनुवर्षे चावून चोथा झालेल्या विषयांवरील मालिकांची निर्मिती सातत्याने केली जाते. छोटय़ा पडद्यावरील मालिका कंटाळवाण्या होईपर्यंत सुरू राहतात. कथानकाचा जीव तितका नसेल आणि मालिका प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात कमी पडत असेल तर ती मालिका संपवायलाच हवी. काही वेळेस टीआरपी तसेच ब्रॉडकास्टर्सच्या दबावामुळे एखादी मालिका सुरू ठेवावी लागते. मालिका उगाच सुरू ठेवल्यास, कथानकही हरवते आणि प्रेक्षकांचाही त्यातला रस संपून जातो. फक्त हिंदीच नाही तर सर्व प्रादेशिक वाहिन्यांमध्येही कमी-जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे.

आयुब खान