स्माइल प्लीज

‘हृदयांतर’ या पहिल्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलेल्या विक्रम फडणीस यांनी तेव्हाही त्यांच्या चित्रपटातून नातेसंबंधांची गुंतागुंत अलवार उलगडत, तितक्याच ठामपणे आपला विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता. फॅ शन डिझायनर असल्याने त्यांची वेगळी सौंदर्यदृष्टी, उत्तम कथा आणि ते साकारण्यासाठी उत्तम कलाकार यांचे अफलातून मिश्रण त्यांच्या चित्रपटातून साकारताना दिसते. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाबद्दलही तेवढीच अपेक्षा असणे साहजिक आहे. इथे एका आजाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा नायिकेच्याच माध्यमातून एक चांगला विचार मांडण्यात ‘स्माइल प्लीज’ हा चित्रपट बव्हंशी यशस्वी ठरला आहे. इथे पुन्हा एकदा दिग्दर्शकाने आपल्या शैलीनुसार वेगवेगळ्या नात्यांमधले ताणेबाणे, आणि तरीही त्यातली भावनिक गुंतागुंत तितक्याच सहजतेने रंगवली आहे.

नंदिनी (मुक्ता बर्वे) ही प्रसिद्ध फॅशन छायाचित्रकार आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, लौकिक मिळवलेली नंदिनी आपल्या कामावर श्रद्धा असलेली, सडेतोड बोलणारी, वागणारी आणि कदाचित त्यामुळेच कित्येकदा तिच्यातील हळवी बाजू समोरच्याला स्पष्ट न करू शकणारी अशी ही व्यक्तिरेखा आहे. नंदिनी आणि तिचे वडील (सतीश आळेकर)यांचे एक विश्व आहे, त्या जोडीला समांतर असे नंदिनीची मुलगी नूपुर (वेदश्री महाजन) आणि पती शिशिर (प्रसाद ओक) यांचे वेगळे विश्व आहे. म्हटले तर एकत्र चालणारे आणि पाहायला गेले तर एक मेकांत अंतर राखून असणारी अशी ही दोन टोकं आहेत. सगळेच वादळ पिऊन शांतपणे आपापल्या पद्धतीने सुरू असलेल्या या विश्वात खळबळ माजते जेव्हा नंदिनीचे आजारपण समोर येते. नंदिनीच्या आजाराच्या निमित्ताने ढवळून निघालेली नाती, नंदिनीची स्वत:ची लढाई, तिचे तिच्या मुलीशी किंबहुना नूपुरचे आपल्या आईशी असलेले नाते, नंदिनी आणि शिशिरचे नाते आणि या सगळ्या पसाऱ्यात नव्याने दाखल झालेल्या विराजचा (ललित प्रभाकर) आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असे भावनांचे वेगवेगळे पदर दिग्दर्शकाने खूप सुंदर पद्धतीने या चित्रपटात जोडले आहेत.

रूढार्थाने ‘स्माइल प्लीज’ हा कुठलाही कौटुंबिकनाटय़ असलेला असा चित्रपट नाही, कोणत्याही घरात घडलेली अशी घटना आणि त्यानिमित्ताने बदलत गेलेले भावभावनांचे कल्लोळ याच्या आधारे नात्यांमधली, जगण्यामधली विसंगती, सतत कशाच्या तरी मागे पळताना कळत असूनही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ नसणे यावर दिग्दर्शकाने नेमकेपणाने बोट ठेवले आहे. इथे अनाथ असलेल्या विराजच्या माध्यमातून त्याला जाणवणारे माणसांचे महत्त्व दिग्दर्शक जाणवून देतो. त्याचवेळेला लहानग्या नूपुरला तुझ्याकडे भरपूर माणसे आहेत, याची जाणीव करून देतानाच त्यांना जपण्याचा विचार तिच्या मनात रुजवण्याचा प्रयत्नही दिग्दर्शक करताना दिसतो. या चित्रपटाची कथा विक्रम फडणीस यांचीच आहे, त्यामुळे चित्रपटातून नेमके काय पोहोचवायचे आहे, याचा स्पष्ट विचार डोक्यात त्यांच्या डोक्यात असल्याने त्या व्यक्तिरेखाही त्याच पद्धतीने उभ्या राहिलेल्या दिसतात. चित्रपटाची पटकथा आणि संवाद इरावती कर्णिक यांची असल्याने त्यांच्या विचारशैलीचा प्रभावही या व्यक्तिरेखांवर आणि एकूणच क थेच्या मांडणीवर दिसल्याशिवाय राहत नाही.

वर म्हटल्याप्रमाणे हा चित्रपट एका आजारावर भाष्य करत नाही, तर त्या आजाराच्या निमित्ताने एकूणच त्या व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन, आजारी व्यक्ती ही एकाचवेळी शरीराने आणि मनानेही खचत असते. त्यामुळे तिचा केवळ सांभाळ करून चालत नाही, तर त्या व्यक्तीचे जगणे सुंदर व्हावे यासाठी मुळात माणूस म्हणून तिचा विचार करत आपल्याकडूनही प्रयत्न करायला हवेत. हे जसे खरे आहे तसेच नेहमीच्या जगण्यातही अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीला गृहीत धरून, त्या व्यक्तीबाबत ठोकताळे मांडून आपली नाती निभावत राहतो. त्यातून केवळ गैरसमज वाढत जातात. इथे ही गोष्ट नंदिनी आणि नूपुर-शिशिर यांच्या आपापसातील नात्यातून पाहायला मिळते. ठोकताळ्यांचे, गैरसमजांचे हे बांध तुटतातही, मात्र अनेकदा वेळ निघून गेलेली असते. नंदिनीच्या करिअरच्या महत्त्वाकांक्षेला समजून न घेता तिच्या बाबतीतली गृहीतके नकळतपणे मुलीवर बिंबवणारा शिशिर इथे आहे, तसेच केवळ वडिलांच्या दृष्टिकोनातून आईकडे बघत गेलेली नूपुरही दिसते. नंदिनीचा आजार समजल्यानंतरचा तिचा आणि तिच्या वडिलांमधला अबोल क्षण पडद्यावर केवळ या दोघांच्या नजरेतून बोलका झाला आहे.

सतीश आळेकर, मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक या चारही कलाकारांनी या चित्रपटात जीव ओतला आहे. याशिवाय तृप्ती खामकर यांचा वावरही हलकाफुलका ठरला आहे. चित्रपटातला शेवटचा क्षणही प्रभावी आणि महत्त्वाचा आहे. या चित्रपटाची गोष्टच मुळात भावनिक आहे, त्यामुळे त्याच्याशी तुम्ही जोडले जाता, यात शंका नाही. मात्र हे नाटय़ आणखी प्रभावी करता आले असते. चित्रपटातील काही प्रसंग अधिक आटोपशीर करत वेग वाढला असता तर त्याची परिणामकारकता वाढली असती. एक चांगली कथा, चांगले दिग्दर्शन आणि उत्तम अभिनय यांची सुरेख भट्टी जमून आलेला असा हा चित्रपट आहे.

* दिग्दर्शन – विक्रम फडणीस

* कलाकार – मुक्ता बर्वे, सतीश आळेकर, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, वेदश्री महाजन, तृप्ती खामकर, डॉ. आदिती गोवित्रीकर.