लहानपणीचा सापशिडीचा खेळ सर्वानाच आठवत असेल. घरात सर्वाच्या आधी पोहोचण्याची ती स्पर्धा. त्यात तुमच्या नशिबाने तुम्हाला शिडी मिळाली, की तुम्ही वरच्या घरात पोहोचता, पण मध्येच एखाद्या सापाचा दंश झाला, तर मात्र सरळ खाली यावे लागते. टीव्हीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर वर्षभर प्रत्येक वाहिनी ‘टीआरपी’ नामक सापाच्या दंशापासून स्वत:ला सावरत वर चढण्याचा प्रयत्न करत असते. या स्पर्धेत सतत नवीन मालिका येतात, जुन्या मालिका आपल्याला ‘अलविदा’ म्हणतात. काही या सर्व स्पर्धेतून तावून सलाखून बाहेर पडल्यावरही स्वत:चे स्थान या टीआरपीच्या स्पर्धेमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम ठेवण्यात यशस्वी होतात. मजा म्हणजे सापशिडीच्या खेळात ज्याप्रमाणे फासे काय पडतील यावर आपले नियंत्रण नसते त्याचप्रमाणे कोणती मालिका, कोणते कथानक प्रेक्षकांना आवडेल याची शाश्वती एका ठरावीक मर्यादेनंतर वाहिनीतील अधिकाऱ्यांनाही देता येत नाही. त्यामुळे केवळ जनताजनार्दनाच्या हातातील रिमोट कंट्रोलवर त्यांनाही विसंबून राहावे लागते. नव्या वर्षांच्या आगमनासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. टीव्हीच्या सापशिडीतील या वर्षीचा खेळाचा डाव संपेल आणि पुन्हा नवीन डावाला सुरुवात होईल. त्यानंतर पुन्हा सर्व वाहिन्या नव्या मालिका, नवे चेहरे, नवे कथानक आणि नव्या योजनांसह तुमच्यासमोर दाखल होतील. त्यामुळे या सरत्या वर्षांमध्ये या मालिकांच्या राज्यामध्ये तुमच्या प्रेक्षकांनी कोणाच्या गुणपत्रिकेमध्ये भरपूर गुण टाकले आणि कोणाला नापास केले याचा एक आढावा..rv01

 ‘स्टार प्लस’ वाहिनीच आघाडीवर
या वर्षीच्या ‘टीआरपी किंवा टीव्हीटी’ नामक गुणपत्रिकेमध्ये ‘स्टार प्लस’ वाहिनीने आपले पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. वर्षभर विविध विषयांवरच्या मालिका देत ‘स्टार प्लस’ने प्रेक्षकांवरची आपली पकड घट्ट ठेवली होती. या वर्षीपासून वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या मोजण्यासाठी ‘टीआरपी’ऐवजी ‘जीव्हीटी’ (ग्रॉस व्हय़ुअरशिप इन थाऊजंड) म्हणजेच ‘हजार प्रेक्षकांची सरासरी’ काढण्याची पद्धत अवलंबली गेली. त्यानुसार ‘स्टार प्लस’ला वर्षभरात ६४७-६६१ जीव्हीटी होता. वर्षांच्या सुरुवातीला कलर्स, झी टीव्ही, सोनी टीव्हीवर मागच्या वर्षीच्या जुन्या मालिका कायम चालू होत्या. तिथेच स्टारने मात्र आपल्या ‘दिया और बाती’, ‘साथ निभाना साथिया’, ‘प्यार का दर्द है’, ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मागच्या वर्षीच्या निवडक मालिका वगळता नव्या मालिका आणि नवीन विषय लोकांना दिले. त्यामध्ये ‘एक हसिना थी’, ‘ये है मोहबते’, ‘निशा और उसके कझीन’, ‘सुहानी सी लडकी’ या मालिकांचा समावेश होता. लोकांना या मालिकांमधील नावीन्य आवडले आणि त्याचे फळ साहजिकच वाहिनीच्या पदरी पडले. त्याच वेळी ‘कलर्स’नेही आपले दुसऱ्या क्रमांकाचे स्थान (५२२-४५० जीव्हीटी) या वर्षी कायम ठेवले. सुरुवातीच्या सहा महिन्यांनंतर ‘झी टीव्ही’ने काहीसा वर येण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना ‘कलर्स’ला फार काळ टक्कर देता आली नाही आणि तिसऱ्या स्थानावर (४४९-३९८ जीव्हीटी) समाधानी राहावे लागले. ‘लाइफ ओके’ने या वर्षांत आपले चौथे स्थान कायम ठेवले. विशेष म्हणजे ‘सोनी टीव्ही’ला पाठी सारत ‘सब टीव्ही’ने पाचवे स्थान पटकावले. नव्याने सुरू झालेल्या ‘जिंदगी’ आणि ‘सोनी पल’ या वाहिन्यांनी सातवे आणि आठवे स्थान मिळवले. महिन्याभरापूर्वीच सुरू झालेल्या ‘एपिक’ वाहिनीची घोडदौड तेजीत चालू झाली आहे. दोन आठवडय़ांच्यातच त्यांचा जीव्हीटी ३ वरून ६ वर पोहोचला आहे.

‘दिया और बाती’ अव्वल
पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारी जुन्या विचाराच्या राजस्थानी कुटुंबाची सून आणि तिच्यामागे भक्कमपणे उभा असलेला तिचा नवरा या कथानकावर आधारित ‘दिया और बाती’ गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही अव्वल स्थानावर आहे. सतत ६.४-६.६चा टीआरपी कायम ठेवत आपल्या आजूबाजूला कोणी भरकटणार नाही याची दक्षता या मालिकेने पुरेपूर घेतली होती. मध्यंतरी मालिकेतील विमानाच्या अपघातासंबंधीचे कथानक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले होते. त्या वेळेस टीआरपीने १४च्या उच्चांकालाही गवसणी घातली होती. तिच्यापाठोपाठ ‘ये है मोहबते’, ‘ये रिश्ता..’, ‘साथिया’ या मालिकांनी आपले पहिल्या पाचांतील स्थान अबाधित ठेवले आहे. त्यानंतर मात्र ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘कुमकुम भाग्य’, ‘जोधा अकबर’ या मालिकांची सततची चढाओढ पाहायला मिळते. गेली अनेक वर्षे आपला दबदबा कायम ठेवलेल्या ‘तारक मेहता..’ या मालिकेसाठी यंदाचे वर्ष मुश्किलीचे गेले आहे. काही ठरावीक आठवडे वगळता मालिका स्पर्धेत खाली उतरली आहे.
सिनेमातील कलाकार टीव्हीवर अपयशी
यंदा अमिताभ बच्चनपासून ते सोनाली बेंद्रेपर्यंत कित्येक बॉलीवूड कलाकारांनी मालिकांच्या विश्वात उतरण्याचा प्रयत्न केला; पण त्यापैकी कोणालाच मनासारखे यश मिळाले नाही. गंभीर विषयाची अमिताभ बच्चन यांच्या ‘युद्ध’ मालिकेलाही १.२-०.७ च्या टीआरपीवर समाधानी राहावे लागले. तसेच भाग्यश्रीची ‘लौट आओ त्रिशा’ प्रेक्षकांच्या तितकी पसंतीस उतरली नाही. सोनाली बेंद्रेने वेगळा विषय निवडण्याऐवजी एकता कपूरची सुरक्षित वाट निवडली खरी; पण ‘अजीब दास्ताँ है ये’ अजूनही १.५-०.७ च्या टीआरपीवर घुटमळते आहे. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ला यंदा ३.४चा टीआरपी मिळाला, तर सलमान खानचा ‘बिग बॉस ८’चा टीआरपी ४.९ वरून सरळ २.५ वर आला आहे.

हलक्याफुलक्या विषयाच्या मालिकांचे पारडे जड
सासू-सुनांच्या मालिकांचे वर्चस्व लोकांच्या मनातून कमी झाले नसले तरी या वर्षी त्यांचा कल हलक्याफुलक्या विषयाच्या मालिकांवर होता. ‘कुमकुम भाग्य’, ‘ये है मोहबते’, ‘जमाई राजा’, ‘वीरा’ या थोडय़ा वेगळ्या विषयाच्या मालिकांना लोकांनी पसंती दिली. या मालिकांमध्येही पारंपरिक सासू-सून भांडणे, नणंद-भावजय द्वेष, कुरघोडी, कारस्थाने होती; पण त्यांची मांडणी हलकीफुलकी, क्वचित प्रसंगी विनोदी असल्यामुळे लोकांना त्या आवडल्या.
 

‘नवी पिढी आणण्याचा’ फॉम्र्युला अपयशी
मालिकेचे कथानक पुढे जात नसेल आणि टीआरपी कमी होत असेल तर सरळ मालिकेत नायक-नायिकेची पुढची पिढी दाखवण्याचा यशस्वी फॉम्र्युला यंदा साफ आपटला. ‘पवित्र रिश्ता’, ‘एक मुठ्ठी आसमाँ’, ‘जोधा अकबर’, ‘महाराणा प्रताप’, ‘साथिया’, ‘कबुल है’, ‘उतरन’ या मालिकांमधील नवी पिढी प्रेक्षकांना मालिकेकडे आकर्षित करण्यास अपयशी ठरली. ‘महाराणा प्रताप’ म्हणून फैजल खानने साधलेली किमया सिद्धार्थ मल्होत्राला अजूनही साधता आलेली नाही.

दीर्घकालीन मालिकांनाही कमी प्रतिसाद
वाहिन्यांवरील ‘लंबी रेस के घोडे’ टीआरपीच्या स्पर्धेत नेहमीच पुढे असतात; पण यंदा मात्र कित्येक दीर्घकालीन मालिकांना प्रेक्षकांनी पाठ दाखवली आहे. ‘तारक मेहता..’, ‘सीआयडी’सारख्या मालिका यंदा आपला करिश्मा दाखवू शकल्या नाहीत. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ची लोकप्रियतासुद्धा कमी होताना दिसली. वर्षांच्या सुरुवातीस दुसऱ्या क्रमांकावर असलेला हा शो वर्ष संपेपर्यंत पहिल्या दहातील आपले स्थान गमावून बसला आहे. शोतील तोचतोचपणा प्रेक्षकांना नकोसा झाला आहे. त्याच वेळी ‘पवित्र रिश्ता’, ‘उतरन’, ‘मधुबाला’ या लोकप्रिय मालिकांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.

टॉप १० लोकप्रिय मालिका
*१ दिया और बाती हम
*२ ये है मोहब्बतें
*३ ये रिश्ता क्या कहलाता है
*४ साथ निभाना साथिया
*५ तारक मेहता का उल्टा चष्मा
*६ एक हसीना थी
*७ कुमकुम भाग्य
*८ ससुराल सिमर का
*९ जोधा अकबर
*१० जमाई राजा