फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूटय़ूबसारख्या समाजमाध्यमांमुळे सेलिब्रिटी व त्यांच्या चाहत्यांमधील अंतर बरेच कमी झाले आहे. यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात चालणाऱ्या घडामोडींची माहिती तर मिळतेच, पण त्याचबरोबर त्यांच्याशी थेट संपर्कही साधता येतो. या माहितीच्या दळणवळणामुळे समाजमाध्यमांना आता इतर वृत्तमाध्यमांच्या तुलनेने अधिक अच्छे दिन आले असेच म्हणावे लागेल. परंतु सुरुवातीला सेलिब्रिटींना आपल्या तालावर नाचवणारी ही माध्यमे कोटय़वधींच्या फॉलोअर्समुळे आता सेलिब्रिटींच्याच तालावर नाचू लागली आहेत. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांची या माध्यमांच्या विरोधात जाणारी एखादी कॉमेंट यांचा धंदा चौपट करू शकते. आणि असाच काहीसा प्रकार स्नॅपचॅट अ‍ॅप्लिकेशनबाबतीत घडला आहे. स्नॅपचॅट हे एक व्हिडीओ, फोटो चॅटिंग अ‍ॅप्लिकेशन आहे. ४५० दशलक्षांपेक्षा जास्त मंडळी या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करतात. हॉलीवूड अभिनेत्री काइली जेनर या अ‍ॅप्लिकेशनमध्ये वाढवलेल्या काही नवीन सुविधांच्या बाबतीत नाराज असून आपली नाराजी तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. आणि तब्बल २४ कोटी ट्विटर फॉलोअर्स असणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीशी सहमत असणाऱ्या मंडळींनी एका झटक्यात हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या फोनमधून काढून टाकले. परिणामी स्नॅपचॅट कंपनीला कोटय़वधींचे नुकसान सहन करावे लागले, परंतु हा झटका एवढय़ावरच थांबला नाही तर लाखो युजर एका झटक्यात निघून गेल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या जाहिराती व सातत्याने केली जाणारी गुंतवणूकही थांबली. त्यांचे शेअर बाजारातील शेअरचे भाव गडगडले. काइली जेनरच्या एका ट्वीटमुळे त्यांना मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे ‘इस कॉमेंट की गूंज’ समाजमाध्यम मालकांना कायम लक्षात राहील, असेच म्हणावे लागेल.