‘स्पेक्टर’ या बॉण्डपटातील चुंबनदृश्यांना कात्री लावण्याचा सेन्सॉर बोर्डाचा निर्णय अतार्किक आणि बुरसट विचारसणीकडे झुकणारा असल्याची टीका अभिनेता इम्रान हाश्मी याने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘स्पेक्टर’ चित्रपटासंदर्भातील वाद सध्या बराच गाजत असून त्यावरून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. सोशल मिडीयावरही सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाची प्रचंड खिल्ली उडविण्यात आली होती. बॉलीवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ अशी ओळख असणाऱ्या इम्राननेही या निर्णयाविषयी नाराजी व्यक्ती करत सेन्सॉर बोर्डाचे हे पाऊल प्रतिगामी असल्याचे सांगितले आहे. ही गोष्ट फक्त बंदीपुरती मर्यादित नाही. सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटातील चुंबनदृश्यांची लांबी कमी करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांचे काही कायदे आणि नियम आहेत. त्याठिकाणी (बोर्डात) चुंबनदृश्यांना विरोध असणारे अनेकजण आहेत. मात्र, त्यामुळे एखाद्या दृश्याला कात्री लावणे योग्य नसल्याचे मत इम्रानने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. चित्रपटांच्या सेन्सॉरशिपसाठी एक कायदा आहे. त्यामुळे तुम्ही चित्रपटाला अ प्रमाणपत्र द्या, परंतु त्यामधील दृश्यांना उगाच कात्री लावू नका, असेही यावेळी इम्रानने म्हटले.