News Flash

‘सोबतीने चालताना’   

पाश्चात्त्य सांस्कृतिक मूल्यं स्वीकारताना भारतीय माणसाच्या मानसिक व भावनिक चिरफळ्या उडताहेत.

‘सोबतीने चालताना’   

ओरबाडत म्हणणे : ‘आय लव्ह यू’

भारतात गेल्या पाव शतकात- म्हणजे ९१ सालानंतर जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे नवे पर्व उजाडल्यानंतर झपाटय़ाने अनेक बदल होत आहेत. त्यांचा वेगही इतका प्रचंड आहे, की मूलत: स्थितीशील असलेल्या भारतीयांना तो अद्यापि पचवता आलेला नाही. अजूनही ते त्यांच्याशी जुळवून घेण्याकरता झगडताहेत. तशात त्यांच्यावर असलेलं पारंपरिक आचारविचारांचं शतकानुशतकांचं ओझं उतरवून ठेवायला ते राजी नाहीत. स्वाभाविकपणेच या बदलांना सामोरे जाताना त्यांची भलतीच त्रेधातिरपिट उडते आहे. विशेषत: या प्रक्रियेमुळे आपल्याकडे आलेली पाश्चात्त्य सांस्कृतिक मूल्यं स्वीकारताना भारतीय माणसाच्या मानसिक व भावनिक चिरफळ्या उडताहेत. त्याचे पडसाद कुटुंबव्यवस्थेत न उमटले तरच नवल. भारतीय कुटुंबव्यवस्था कधीच आत्मकेंद्री नव्हती. किंबहुना, भारतीयांचं जीवनविषयक तत्त्वज्ञानच मुळी ‘स्व’ला मागे सारून इतरांसाठी त्याग करण्याचं, त्यांना सुखी करण्याचं, त्यांच्या कल्याणासाठी झटण्याचं आणि त्यातच आपलं सुख-समाधान व इतिकर्तव्यता मानण्याचं राहिलेलं आहे. मात्र, आज जागतिकीकरणाचा हात धरून पाश्चात्त्य आचार-विचारांबरोबरच आपल्याकडे आलेली व्यक्तिकेंद्री मूल्यं त्याला झेपेनाशी झाली आहेत. ‘स्व’ला केन्द्रस्थानी ठेवून जगण्याचं मूल्य भीषण विध्वंसक आहे अशी त्याची धारणा आहे. नव्हे, खात्रीच आहे. आणि त्याचे विषण्ण अन् उद्ध्वस्त करणारे परिणाम तो आज प्रत्यक्ष भोगतोही आहे. वर्तमानाची तडक दखल घेणाऱ्या मराठी रंगभूमीने हे सामाजिक-कौटुंबिक वास्तव त्वरित टिपणं हेही नैसर्गिक होय. ‘कलाभारती’ संस्थेचं ‘सोबतीने चालताना’ हे डॉ. आनंद नाडकर्णी लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित नाटक ही त्याचीच परिणती आहे.

अनुराधा आणि ललित या दाम्पत्यात लग्नानंतर काही कारणांनी अंतराय निर्माण झालाय . खरं तर त्यांचा प्रेमविवाह झालेला. मात्र, दोघांच्या आत्मकेन्द्री वृत्तीपायी त्यांच्यात कुरबुरी, धुसपुशी सुरू झाल्या. तशात स्वभावातील अहंपणामुळे  आणि ‘तडजोड म्हणजे शरणागती’ या समजुतीमुळे या काटय़ाचा नायटा व्हायला वेळ लागला नाही. एकमेकांपासून दुरावत ते दोघं आता वेगळं झाले आहेत. अनुराधा आपल्या आर्किटेक्ट वडिलांकडे (अप्पा) राहते आहे, तर ललित आपल्या घरी. लग्नानंतर सासूशी पटत नाही म्हणून अनुराधाने वेगळा संसार मांडला. खरं तर वडिलांच्या माघारी अत्यंत कष्टांनी आपल्याला वाढवणाऱ्या आईला सोडून स्वतंत्र राहणं ललितला मंजूर नव्हतं. परंतु अनुराधाच्या हट्टापुढे त्याला माघार घ्यावी लागली. आणि आता तीच घर सोडून निघून गेली. याउप्पर रीतसर सनदशीर मार्गानं दोघांनी वेगळं व्हायचं तेवढंच बाकी उरलेलं आहे. त्या दृष्टीनं त्यांचा प्रवास सुरू आहे.

तिढा आहे तो तन्मयचा. त्यांच्या आठ-दहा वर्षांच्या मुलाचा. त्याला आपल्यातल्या बेबनावाची झळ पोहोचू नये म्हणून त्यांनी शिक्षणाच्या निमित्तानं त्याला दूर हॉस्टेलमध्ये ठेवलंय. अजून त्याच्यापर्यंत आपल्यातल्या बेबनावाच्या गोष्टी पोचलेल्या नाहीत अशी दोघांची समजूत आहेत. यावर ललितचं म्हणणं आहे : तन्मयला आपलं वेगळं होणं आताच कळणं गरजेचं आहे. तर अनुराधाला ते इतक्यातच व्हायला नको आहे. अप्पांना मात्र अजूनही या दोघांनी तन्मयसह एकत्र सुखानं नांदावं असं वाटतंय. त्यासाठी ते आपल्या परीनं प्रयत्न करत असतात. परंतु ती दोघं समोरासमोर आली की कशा ना कशावरून वादाची ठिणगी पडतेआणि त्यांचे सामोपचाराचे प्रयत्न वाया जातात. तरीही त्यांना आशा आहे, की तन्मयसाठी का होईना, ते एकत्र येतील. म्हणूनच ते तन्मय सुटीत घरी येणार असताना त्यांना तो इथं असेतो  एकत्र राहण्याचं ‘नाटक’ करावं असं सुचवतात. ललितचा याला विरोध असतो. कारण या नाटकानं काहीही निष्पन्न होणार नाही, हे त्याला ठाऊक असतं. उलट, नस्ता प्रसंग ओढवून तन्मयसमोर तमाशा होईल अशीही भीती त्याला वाटत असतं. अनुराधाही या गोष्टीला राजी नसते. परंतु आर्किटेक्ट म्हणून गुरुस्थानी असलेल्या सासऱ्यांचा- अप्पांचा शब्द ललितला मोडवत नाही. म्हणून अखेरीस नाइलाजानं तो या गोष्टीला राजी होतो. अनुराधाही ही तडजोड मान्य करते.

तन्मय घरी येतो तेव्हा दोघं त्याच्यासमोर एकमेकांशी चांगलं वागायचा प्रयत्न करतात. परंतु त्याची पाठ वळताच ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊन त्यांच्यात कशा ना कशावरून तरी भांडणाला तोंड फुटतंच. त्यांच्यातला दुरावा संपावा म्हणून अप्पा हरतऱ्हेनं यत्न करतात. परंतु व्यर्थ! तन्मयलाही आपल्या आई-वडिलांमध्ये काहीतरी बिनसलंय हे एव्हाना कळून चुकलेलं असतं. मात्र त्याला ते दोघंही एकत्र राहायला हवे असतात. त्यांच्यातल्या भांडणांना कंटाळून तो आपल्या आजीकडे- ललितच्या आईकडे निघून जातो. त्यामुळे आपल्या या भांडणांत आपण तन्मयला हरवून बसू याची प्रथमच दोघांनाही तीव्रतेनं जाणीव होते.

पण..

संघर्षरत नवरा-बायकोच्या नात्यातले मानसिक व भावनिक गुंते, त्यातून या संबंधांत पडत जाणाऱ्या गाठी, निरगाठी आणि अपरिहार्यपणे त्याची परिणती नातं तुटण्यात होणं, हे काही नवं नाही. आदिम काळापासून हे चालत आलेलं आहे. फक्त त्याची कारणं कालपरत्वे आणि माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तीनुसार वेगवेगळी असतील. आज  माणसाचं अतिरेकी व्यक्तिकेंद्री होणं याला कारणीभूत ठरते आहे.  प्रत्येकाचा अहम् आज इतक्या टोकाला गेलाय, की दुसऱ्याचा साधा विचार करणंही माणसानं सोडून दिलंय. समोरच्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या समस्येकडे पाहणं आणि त्याद्वारे आत्मपरीक्षण करणं, ही गोष्ट आज इतिहासजमा झालीय की काय अशी साधार भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. आपल्या नजरेतून दिसतं तेच वास्तव असं धरून चालण्यानं अनेक गंभीर समस्या निर्माण होताहेत. कुटुंबं तुटताहेत. माणसं एकटी, एकाकी होत चालली आहेत. परंतु कुणीच आत्मपरीक्षण करायला तयार नाहीए. ‘सोबतीने चालताना’ हे नाटक या गोष्टीकडेच निर्देश करू पाहतंय. ‘मी, मला, माझं’ एवढंच सीमित विश्व झालेल्या आजच्या माणसांचं (त्यात स्त्री-पुरुष दोघंही आले!) मानसिक स्वास्थ्य हरपलं असेल तर त्याला ते स्वत:च जबाबदार आहेत, या निष्कर्षांप्रत यावं लागतं. तेच नाटकाचं ईप्सित आहे. त्याचबरोबर असा तऱ्हेनं कुटुंबं तुटू नयेत असंही लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना वाटतं आहे. त्यांची ही सदिच्छा त्यांनी या नाटकावर आरोपित केली आहे. परंतु वास्तव कधी असं कुणाच्या नुसत्या ‘वाटण्या’वर अवलंबून असत नाही. ते कटु असतं. हे लेखकालाही ठाऊक असणारच. कारण ते स्वत: मानसोपचारतज्ज्ञही आहेत. यामुळे झालंय काय, की नाटक वास्तवदर्शीत्वाचा मार्ग सोडून भरकटलं आहे आणि उत्तरार्धात चक्क मेलोड्रॅमॅटिक झालं आहे. म्हणजे भारतीय मानसिकतेच्या प्रेक्षकांना नाटकाचा जो शेवट व्हावा असं वाटतं, तोच लेखकानं घडवून आणला आहे. परंतु हे नैसर्गिकरीत्या न घडल्यानं नाटकाचा शेवट कृत्रिम वाटतो. एकीकडे नाटक आजचं वास्तव जसंच्या तसं मांडत असताना त्यांनी हा सत्तरच्या दशकातल्या मेलोड्रामाचा आश्रय का घ्यावा, हे कळत नाही. यातलंी तीन प्रमुख पात्रं वास्तववादी रंगवताना दुसरीकडे तन्मयचं पात्र लेखकानं आपल्या विशफुल थिंकिंगचं वाहक असलेलं रेखाटलं आहे. साहजिकच ते अतिसमंजस, अकाली प्रौढ झालेलं आहे. या वयातल्या मुलांना आई-वडिलांच्या वेगळं होण्याचे परिणाम भोगावे लागतात, हे मान्य. परंतु त्यांची त्याबाबतीतली भावनिक-मानसिक उलघाल, कोंडी, भविष्याबद्दलच्या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांचं कोषात जाणं, किंवा वास्तवाला नाइलाजानं सामोरं जाणं- या बाबी व्यक्ततेच्या पातळीपेक्षा अव्यक्त राहण्याचीच शक्यता अधिक. त्यातून त्यांच्यात निर्माण होणारे नाना गंड हाही वेगळ्या अभ्यासाचा विषय ठरावा. या नाटकात मात्र तन्मयवर अकारण प्रौढत्व, प्रगल्भत्व लादलं गेलं आहे असं वाटत राहतं. कारण सदासर्वकाळ तो त्या मानसिक-भावनिक घुसळणीतून जाताना दिसत नाही. त्यामुळेच ते कृत्रिम वाटतं.

दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनीही संहितेतील हा विरोधाभास नीट जाणून न घेता नाटकाचा लोकानुनयी शेवट करण्याचा सरधोपट मार्ग का पत्करावा, हे समजत नाही. त्यामुळे एका उत्तम नाटकाचा आभास निर्माण करणारं हे नाटक ठरलं आहे. विशेषत: यातल्या भावगीतसदृश गाण्यांनी त्यावर शिक्कामोर्तबच केलेलं आहे. ही गाणी स्वतंत्रपणे श्रवणीय आहेत, परंतु नाटकाचा अपेक्षित परिणाम मात्र ती पातळ करतात. उत्तरार्धात नाटक मेलोड्रामाकडे वळल्यावर मात्र ती खटकेनाशी होतात. नाटकातील वास्तवदर्शन आणि मेलोड्रामा यांतलं द्वंद्व दिग्दर्शकानं चलाखीनं हाताळलं आहे. परंतु जाणत्या प्रेक्षकांना ते कळल्याशिवाय राहत नाही.

मनोहर माधव यांनी मोहन वाघांच्या नेपथ्याची आठवण व्हावी असं ऐसपैस घर उभं केलं आहे. परंतु नाटकात ते कसलीच भर घालत नाही. विवेक मिस्त्री यांचं संगीत स्वतंत्रपणे कर्णमधुर आहे.

तन्मय साकारणाऱ्या अथर्व बेडेकर या चुणचुणीत मुलाची रंगमंचीय समज थक्क करणारी आहे. संवादांतील अर्थाचे पदर समजून घेत त्याने ते उच्चारले आहेत. त्याच्या रूपानं एक उत्तम बालकलाकार रंगभूमीला मिळाला आहे. मंगेश देसाई हे बऱ्याच काळानंतर नाटकात अवतरले आहेत. ललितची सगळी व्यथा-वेदना आणि त्याच्या स्वभावातील हायपरनेस त्यांनी समजून-उमजून नेमकेपणानं व्यक्त केला आहे. अनुराधा आणि त्याच्यातील संपलेला संवाद त्यानं स्वीकारला आहे. याला आपणही काही अंशी जबाबदार आहोत, हेही त्याला एका क्षणी जाणवतं आणि तो तेही मान्य करतो. योगिनी चौक यांच्या अनुराधामधलं एकारलेपण सतत अधोरेखित होत राहतं. परंतु तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्यात असलेला समजूतदारपणा मात्र मुळात संहितेतच व्यक्त झालेला नसल्याने हे पात्र अकारण खलत्वाकडे झुकतं. त्यामुळे शेवटाकडे तिला झालेली उपरती पचवणं अवघड जातं. त्यातूनच नाटक मेलोड्रामाकडे वळतं. यापूर्वीच्या त्यांच्या ‘आई, तुला मी कुठं ठेवू?’ या नाटकातही अशीच एकांगी भूमिका त्यांच्या वाटय़ाला आली होती. प्रदीप वेलणकर यांनी मुलगी आणि जावयातील मनभेद दूर करण्याचे केलेले अथक प्रयत्न आणि त्याला आलेलं सततचं अपयश, नातवासाठी का होईना, त्यांनी तडजोड करावी यासाठी त्यांनी घातलेला घाट आणि त्यातही तोंडघशी पडणं.. या साऱ्या पराभवांतली मानसिक-भावनिक फरफट, उद्विग्नता आणि घुसमट व्यक्ततेपेक्षा अव्यक्तातून अधिक तीव्रतेनं पोहोचवली आहे.

एका चांगल्या विषयाला समकालीन संदर्भासह थेटपणे भिडता भिडता हे नाटक राहिलं, ही खंत नाटय़गृहाबाहेर पडताना वाटत राहते.

नाटय़रंग : रवींद्र पाथरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 6:38 am

Web Title: sobatine chaltana marathi natak
Next Stories
1 ‘साय-फाय’च्या नव्या विश्वात नेणारा ‘फुंतरू’
2 आशा भोसले यांच्या नातीचे ‘हिल पोरी हिला’!
3 करिनाच्या ‘फेव्हिकॉलसे’ गाण्यावर शबाना आझमी भडकल्या..
Just Now!
X