रोजची चित्रीकरणाची धावपळ आणि त्यातून मग वेळ काढून समाजमाध्यमांवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना महानायक अमिताभ बच्चन अनेकदा आठवणीत रमतात. त्यांच्या आठवणींच्या पोतडीतून अनेक गमतीदार किस्से त्यांच्या ब्लॉगवर उमटत जातात. त्या वेळी त्यांनी घेतलेली मेहनत पाहून आपल्यालाही अचंबित व्हायला होतं. कित्येक दिवसांच्या निर्बंधांनंतर ‘गुडबाय’ या चित्रपटासाठी दिवसभर न थांबता चित्रीकरण करून झाल्यावर अमिताभ यांनी सुरुवातीच्या काळात आपण कसे एका दिवसात दोन पाळ्यांमध्ये चित्रीकरण पूर्ण करत होतो, याची आठवण चाहत्यांना सांगितली.

‘गुडबाय’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. ते करत असताना दिवसभर जेवणाची सुट्टी न घेता चित्रीकरण के ल्यानंतर अमिताभ यांना सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील आपली धावपळ आठवली. त्या काळात आपण दिवसाला दोन पाळ्यांमध्ये काम करत होतो. दोन पाळ्यांमध्ये दोन वेगवेगळ्या चित्रपटांचे चित्रीकरण के ले जायचे तेही वेगवेगळ्या ठिकाणी… बरं ही चित्रीकरणाची स्थळे एकाच शहरात असतील असंही नव्हतं. त्यामुळे जिथे ज्या शहरात चित्रीकरण असेल तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी चित्रीकरणाला वेळेत पोहोचणं गरजेचं असायचं. त्यांनी ‘शोले’ आणि ‘दीवार’ अशाच पद्धतीने एकाच वेळी चित्रीकरण करताना आपली कशी धावपळ झाली, याची आठवण चाहत्यांना सांगितली. ‘दीवार’चं चित्रीकरण मुंबईत सुरू होतं. तर ‘शोले’चा रामगढचा सेट हा बंगळूरुमध्ये उभारण्यात आला होता. दररोज या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी मुंबई ते बंगळूरु अशी धावपळ अमिताभ यांनी के ली होती. ‘दीवार’चं अखेरचं दृश्य चित्रित व्हायचं होतं. त्यात रात्रीचे दृश्य असल्याने ते शशी कपूर आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याबरोबर मुंबईत बलार्ड इस्टेट येथे चित्रीकरण करत होते.

‘दीवार’च्या शेवटच्या दृश्यात भाऊ पाठलाग करतो आहे आणि मग माझ्या पाठीत गोळी लागते असं दृश्य चित्रित व्हायचं होतं. या चित्रीकरणासाठी रात्री दहानंतरची परवानगी मिळाली होती. त्यामुळे रात्रभर चित्रीकरण करावं लागायचं. पहाटे ५ वाजता त्याचं चित्रीकरण संपलं की मग थेट विमानतळावर पोहोचायचं आणि विमानाने बंगळूरुगाठायचं. बंगळूरुमध्ये उतरल्यावर तिथून पुन्हा रामगढच्या सेटपर्यंत एक तास गाडीने प्रवास करायला लागायचा. दिवसभर तिथे चित्रीकरण करून संध्याकाळी पुन्हा विमान पकडून मुंबईत पोहोचायची लगबग सुरू व्हायची. मध्ये विमानात जी काही झोप घेता येईल तेवढी घ्यायचो. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण संपेपर्यंत ही धावपळ सुरू होती, अशी आठवण अमिताभ यांनी सांगितली आहे. अशाच प्रकारची धावपळ त्यांनी आपल्या स्टेज शोसाठीही के ली होती. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन आजारी पडले, तेव्हा अमिताभ यांचे जगभरात बारा ठिकाणी स्टेज शो होणार होते. रविवारी रात्री शेवटचा शो संपला की मुंबईत वडिलांकडे परतायचं. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत वडिलांबरोबर राहायचं आणि पुन्हा शोसाठी परतायचं हा काही काळासाठीचा नित्यक्रम होता. पण इतक्या गोंधळात एकदाही विमान चुकलं नाही किं वा शोला वेळेवर पोहोचलो नाही असं एकदाही घडलं नाही, असे अभिमानाने सांगत ब्लॉगवरच्या या गप्पांचा त्यांनी समारोप के ला.