29 January 2020

News Flash

प्रमाणीकरणाच्या शतकाचा गौरव

रुपेरी पडद्यामागच्या विज्ञानाचा सन्मान अशीच ही घटना म्हणावी लागेल.

कलाकृतीची शैली प्रमाणीकरणात बांधता येत नाही, पण कलाकृती जर विज्ञानामुळे साकार होत असेल ते तंत्र प्रमाणीतच असायला हवे हे सरळ साधे उद्दिष्ट समोर ठेवून एका संस्थेची अमेरिकेत १९१६ साली स्थापना झाली. तिचं नाव ‘एसएमपीटीई’ (सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इंजिनीअर्स.) चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या तंत्राचे जागतिक प्रमाणीकरण ठरवणारी ही संस्था आज शतक पूर्ण करत असतानाच वैज्ञानिक आणि तांत्रिक विभागातील कार्याबद्दल ‘विशेष ऑस्कर’ सन्मानाने तिचा गौरव करण्यात आला आहे. रुपेरी पडद्यामागच्या विज्ञानाचा सन्मान अशीच ही घटना म्हणावी लागेल.

मुळात आपल्याकडे रुपेरी पडद्याकडे तंत्रापेक्षा कलाकारांसाठीच अधिक पाहिले जाते. पण विज्ञानाबरोबरच प्रमाणीकरणाची निकड असते याची जाणीव अमेरिकेत झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान सैनिकांना युद्धाचे प्रशिक्षण चित्रपट माध्यमातून देण्याची संकल्पना पुढे आली. पण दृक्श्राव्य तंत्रात वेगवेगळ्या उत्पादकांनी स्वत:च्या पद्धतीने तयार केलेली निर्मिती दाखवताना अनेक अडचणी होत्या. तेव्हा या तंत्रज्ञानाला एका सूत्रात बांधणारी तंत्रज्ञांची संस्था असावी असे प्रयत्न सरकारी पातळीवरून सुरू झाले. सी. एफ. जेकिन्स (पहिल्या मोशन पिक्चर प्रोजेक्टरचे निर्माते) यांच्या नेतृत्वाखाली १९१५ मध्ये बराच खल झाला आणि जुलै १९१६ साली सोसायटी ऑफ मोशन पिक्चर इंजिनीअर्सची स्थापना झाली. १९५० साली दूरचित्रवाणीच्या आगमनानंतर या नावात टेलिव्हिजनची भर पडली.

तंत्रज्ञानाच्या वापरात एकसूत्रता असावी, जेणेकरून कोणत्याही ठिकाणी कोणतेही तंत्रज्ञान वापरताना अडचणी येऊ  नयेत हा त्यांचा उद्देश. तंत्रज्ञान बदलेल तसे प्रमाणीकरणात योग्य ते बदल करत त्यांनी आज संपूर्ण जगातील चित्रपट तंत्राला एका सूत्रात बांधायचा प्रयत्न केला आहे. डिजिटल सिनेमाच्या आधी एसएमपीटीईने तब्बल पाच हजारांहून अधिक वेगवेगळी प्रमाणे प्रस्थापित केली आहेत. ३५ एमएम फिल्मचे प्रमाणीकरण ही त्यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणावी लागेल.

आपणदेखील एसएमपीटीईची अनेक प्रमाणे वापरली आहेत. दूरदर्शनच्या काळात प्रक्षेपण सुरू होण्याआधी पाच-दहा मिनिटे दिसणारा कलर बार हा दूरचित्रवाणी संचाच्या कॅलिबरेशनसाठी एसएमपीटीईनेच तयार केला होता. केवळ एक औपचारिकता म्हणून पाहण्याची सवय झाल्यामुळे आपण याबाबत अनभिज्ञच असायचो इतकेच.

डिजिटल युगात एसएमपीटीई सुमारे ४८ स्टॅण्डर्डवर काम करत आहे. त्यापैकी पन्नास टक्के स्टॅण्डर्डस वापरात आहेत. भारताचा सहभाग मात्र अगदीच अलीकडच्या टप्प्यावरचा आहे. १९९३ पासून विविध शोधनिबंधाच्या माध्यमातून या संस्थेशी जवळीक असणाऱ्या उज्ज्वल निरगुडकरांच्या प्रयत्नाने २०१३ साली या एसएमपीटीईचा भारत विभाग सुरू झाला. उज्ज्वल निरगुडकर हे सध्या या विभागाचे चेअरमन आहेत.

थेट प्रेक्षकांशी निगडित असणाऱ्या एसएमपीटीईच्या दोन महत्त्वाच्या प्रमाणांचा उल्लेख त्यानिमित्ताने करावा लागेल. डिजिटल प्रोजेक्शन व्हेरीफायर आणि डिजिटल सिनेमा पॅकेज स्टॅण्डर्ड. (डीसीपी-एकप्रकारची हार्डडिस्क, ज्याद्वारे आपण चित्रपट पाहू शकतो.) ज्या प्रोजेक्टरद्वारे आपण पडद्यावर चित्रपट पाहणार आहोत, तो प्रोजेक्टर योग्य त्या दर्जाचे चलचित्र दाखवू शकतो का? त्यातील रंगांचे प्रमाण योग्य आहे का? याची चाचणी डिजिटल प्रोजेक्शन व्हेरीफायरमध्ये केली जाते. विविक्षित डीसीपी वापरून त्याद्वारे प्रोजेक्टरचा दर्जा नोंदवला जातो. निरगुडकरांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल गोवा आणि केरळ फिल्म फेस्टिव्हलसाठी हे प्रमाण वापरले आहे. तसेच सध्या सिरीफोर्ट ऑडिटोरिअमच्या चारही स्क्रीन एसएमपीटीईच्या प्रमाणानुसार अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे निरगुडकरांनी सांगितले. हे ऑडिटोरिअम भारत सरकारचे असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे स्क्रीनिंग या ठिकाणी केले जाते. त्यामुळे याचे अनुकरण देशातील इतर चित्रपटगृहांमधून होऊ शकते.  एका अंदाजानुसार आपल्याकडे असणाऱ्या सुमारे ११ हजार स्क्रीन्सपैकी निम्म्या स्क्रीन्स या परीक्षेत उतीर्ण होत नाहीत. एसएमपीटीईच्या प्रमाणीकरणानुसार किमान २के प्रोजेक्शन अपेक्षित असते, पण आपल्याकडे सर्रास १के दर्जाचे प्रोजेक्शन होत असते. तर डीसीपी तयार करण्याचे स्टॅण्डर्ड पाळण्याचे प्रमाण पन्नास टक्के आहे. आणि न पाळणारे उरलेले ५० टक्के अशियाई देश आहेत.

ही प्रमाणे ठरविण्यासाठी सुमारे २०० तंत्रज्ञांची परिषद दर पाच वर्षांनी जगात वेगवेगळ्या ठिकाणी भरत असते. एखाद्या प्रमाणीकरणात बदल करायचा किंवा ते तसेच सुरू ठेवायचे हे येथे ठरते. अशी परिषद पुढील काळात भारतात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सध्या असंख्य गॅझेट्सनी आपले विश्व व्यापले असताना दृक्श्राव्य प्रमाणीकरणाचा मुद्दा हा अपरिहार्य असणार आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अ‍ॅपलसारख्या कंपन्या एसएमपीटीईच्या सदस्य होणे हे भविष्याची दिशा दाखवणारे आहे. गरज आहे ती आपणदेखील या प्रमाणीकरणात तेवढय़ाच वैज्ञानिक दृष्टीने सहभागी होण्याची. ऑस्करच्या निमित्ताने ही जाणीव झाली तर हेही नसे थोडके..

First Published on February 28, 2016 2:59 am

Web Title: society of motion picture television engineers smpte institute get special oscar award
Next Stories
1 धक्क्यांच्या तयारीत ऑस्कर!
2 ‘राजनीती’चा सिक्वल करायचाय..’
3 कुसुमाग्रजांचा जीवनपट उलगडणारा ‘प्रवासी पक्षी’ आज झी मराठीवर
X