मुंबईपासून दूर असलेल्या नगर जिल्ह्य़ातील एका घरात विठ्ठल कऱ्हाडे यांचा त्यांच्या लहान भावाशी संवाद सुरू होता. त्यांचा भाऊ त्यांना शेतजमीन विकायला सांगत होता. कऱ्हाडे कुटुंबाची परिस्थिती रोजच्या कष्टाने दोन घास मिळतील, अशी बेताचीच होती. अशा वेळी हातात असलेली एकमेव जमीन विकण्याची गळ भाऊ घालत होता. तेही कशासाठी तर सिनेमा बनवण्यासाठी. ‘माझ्या या सिनेमाने आपल्याला चांगले दिवस येतील,’ असा विश्वास भाऊराव कऱ्हाडे यांनी कुटुंबीयांना दिला. अखेर जमीन विकून ८०-८५ लाख उभे राहिले आणि ‘ख्वाडा’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट तयार झाला.
‘ख्वाडा’ चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्कार आणि सवरेत्कृष्ट ऑडिओग्राफी असे दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भन्नाट आनंद झाला आहे, अशी भाऊराव कऱ्हाडे यांची प्रतिक्रिया होती. चित्रपटांचा कुठलाही अनुभव नसताना केवळ शाळकरी वयापासून असलेले चित्रपटांचे वेड आणि त्यातून चित्रपटनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या भाऊराव क ऱ्हाडेंनी आपली शेतजमीन विकून चित्रपटासाठी पैसा गोळा केला. १ कोटी २० लाख रुपये एवढय़ा खर्चात त्यांनी स्थलांतरितांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘ख्वाडा’ची निर्मिती केली आहे. त्यासाठी दोनदा थोडी थोडी जमीन विकून त्यांनी ८० ते ८५ लाख उभे केले. मात्र, तेही अपुरे पडले. चित्रपटातील कलाकार आणि मित्रांच्या मदतीने ‘ख्वाडा’चित्रपट पूर्ण करून एकटय़ा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित करण्यात त्यांना यश आले. मात्र, महोत्सवात मिळालेला लोकांचा प्रतिसाद मोठा होता, असे कऱ्हाडे सांगतात.
लहानपणी गावातील एकाच टीव्हीवर वेडय़ासारखे बघितलेले चित्रपट एवढय़ाच भांडवलावर त्यांनी चित्रपट दिग्दर्शक बनायचा विचार पक्का केला होता. त्यासाठी पुण्यात एफटीआयआय गाठून शिक्षण घेता येईल, ही माहितीही जमवली. मात्र, वडील वारल्यामुळे बारावीतच शिक्षण सोडण्याची वेळ क ऱ्हाडेंवर आली. त्यानंतर दोन वर्षे अशीच गेली. एकदा शेतातील कांदा विकण्यासाठी म्हणून त्यांना पुणे गाठता आले. तेव्हा अडतदाराकडूनच उधार पैसे घेऊन त्यांनी ‘एफटीआयआय’ गाठले. पण, अर्धवट शिक्षणामुळे तिथेही प्रवेश मिळाला नाही. मग यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘मास कम्युनिकेशन’ला प्रवेश घेतला. तिथे भेटलेल्या नखाते सरांनी आपल्याला सिनेमाचे इत्थंभूत तंत्र शिकवल्याचे क ऱ्हाडे सांगतात. पुणे ते नगर प्रवासात जाणवलेले स्थलांतरितांचे प्रश्न, धनगर समाजाचा जाणीवपूर्वक केलेला अभ्यास यातून ‘ख्वाडा’ची पटकथा तयार झाली. मात्र, कोणी निर्माते कथा घ्यायला तयार होईनात तेव्हा क ऱ्हाडे यांनी जमीन विकली. मात्र, चित्रीकरणाच्या पहिल्याच शेडय़ूलमध्ये पैसे संपले, पाऊस सुरू झाल्याने चित्रपटही रखडला. तरीही चित्रपटातील कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी धीर सोडला नाही. पुन्हा जमीन विकली, मित्रांकडून पैसे घेतले आणि हा चित्रपट महोत्सवापर्यंत पोहोचला, असे क ऱ्हाडे यांनी सांगितले. राष्ट्रीय पुरस्कारांमुळे बळ वाढले असून आता ‘ख्वाडा’ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो चित्रपट रीतसर प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे क ऱ्हाडे यांनी सांगितले.