‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हे नाव आता जरी सर्वांच्या सवयीचं झालं असलं तरीही या चित्रपटाचं नाव पहिल्यांदा ऐकणाऱ्यांचे चेहरे मात्र पाहण्याजोगे असतात. पण, या चित्रपटाचं कथानक पाहता बॉक्स ऑफिसवर खिलाडीची खेळी चालणार का, याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिलीये. सध्या खिलाडी कुमार आणि भूमी पेडणेकर या चित्रपटाची विविध मार्गांनी प्रसिद्धी करत आहेत. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अक्षय कुमारने त्यासंबंधी काही खुलासेही केले.

त्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं नाव ऐकूनच नकार दिला होता. कारण, त्याचं नाव ‘संडास : एक प्रेम कथा’ असं ठेवण्यात आलं होतं. देशातील काही भागांमध्ये शौचालयाची सुविधाही उपलब्ध नसल्यामुळे महिलांना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं यावर चित्रपटाचं कथानक भाष्य करतं. पण, चित्रपटाचं नाव आणि हा चौकटीबाहेरचा विषय या मुद्द्यांना अनुसरुन आधी बऱ्याच कलाकारांनी यात काम करण्यास नकार दिला. मुख्य म्हणजे खुद्द अक्षयनेच या चित्रपटाची स्क्रीप्ट जवळपास चार वर्षांपूर्वी वाचली होती. त्याच्यानंतरही काही कलाकारांनी चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली. पण कोणीच त्यात काम करण्यास तयार झालं नाही. सरतेशेवटी हा चित्रपट अक्षयच्याच वाट्याला आला आणि बघता बघता चर्चेचा विषय ठरला.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

चित्रपट खिलाडी कुमारच्या हाती आला त्यानंतर त्याचं नाव बदलून ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ असं करण्यात आलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीपासूनच अक्षयने जनहिताच्या कामांमध्येही हातभार लावला. शौचालयांचं महत्त्व आणि त्यांची गरज याविषयी जनजागृती करणारे काही व्हिडिओसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यातच चित्रपटाच्या ट्रेलर, गाणी आणि खुसखुशीत संवादांनी त्याबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढवली. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. श्री नारायण सिंग दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे आता या कलाकारांनी साकारलेल्या ‘केशव’ आणि ‘जया’ यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची दाद मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.