सध्याचे युग हे जाहिरातींचे असून आपले उत्पादन खपविण्यासाठी किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिरात हे सशक्त माध्यम आहे. नाटक व चित्रपटाच्या जाहिरातीसाठीही वेगवेगळ्या कल्पना लढविल्या जातात. नाटकाच्या जाहिरातीत वापरले जाणारे शब्द किंवा वाक्ये ही नाटकासाठी प्रभावी ठरतात. नाटकाच्या या ‘शब्दवेधी’ जाहिरातींविषयी..

नाटकांच्या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेले शब्द किंवा वाक्य यांना खूप महत्त्व असते. नाटकाचा संपूर्ण विषय व आशय त्यातून सांगता येतो. प्रेक्षकांना नाटकाकडे वळविण्यासाठी किंवा नाटकाबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी या जाहिराती व त्यातील ‘शब्दफेक’ मोलाची भूमिका बजावतात. सध्या काही अपवाद वगळता जाहिरातीच्या मर्यादित जागेमुळे हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. नाटक चांगले आहे की नाही, ते चालेल की पडेल हा नंतरचा भाग असला तरी नाटकाबाबत कुतूहल निर्माण करण्यासाठी आणि प्रेक्षकांना नाटकाकडे वळायला भाग पाडण्यासाठी नाटकांच्या जाहिरातीमधील ही शब्दफेक महत्त्वाची ठरते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

ज्येष्ठ रंगकर्मी, विविध नाटय़संस्थांचे माजी व्यवस्थापक आणि आजवर २५ हून अधिक नाटकांच्या जाहिरातीसाठी शब्दफेक करणारे अशोक मुळ्ये यांनी ‘गोलपीठा’या नाटकासाठी केलेली जाहिरात लक्ष्यवेधी ठरली होती. वेश्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या नाटकाला मुंबईतील एका प्रतिष्ठित नाटय़गृहात प्रयोग करण्यास बंदी घालण्यात आली होती. मुळ्ये यांनी ‘अजब न्याय नाटय़मंदिराचा’ अशी शब्दफेक करून ‘वेश्यांना मंदिरात प्रवेश आहे, पण त्यांच्या व्यथा-वेदना मांडणाऱ्या नाटकाला नाटय़गृहात मात्र बंदी’ असे वाक्य त्या जाहिरातीत लिहिले होते. पुढे काही दिवसांनी ‘गोलपीठा’ नाटकाला नाटय़गृहाचे दरवाजे खुले झाले. सध्या गाजत असलेल्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या जाहिरातीही मुळ्ये यांनीच केल्या होत्या. या नाटकाकडे प्रेक्षकांना आकृष्ट करून घेण्यासाठी त्या महत्त्वाच्या ठरल्या. नाटय़निर्मात्या लता नार्वेकर यांच्या श्री चिंतामणी नाटय़संस्थेच्या ‘सही रे सही’ या नाटकाच्या जाहिरातींसाठी मुळ्ये यांनी एक वर्षभर विविध वाक्यांची शब्दफेक केली होती. या जाहिरातीसाठी लता नार्वेकर यांनी मुळ्ये यांना मुक्तहस्ते परवानगी दिली. त्यात कधीही व कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही. इतकेच नव्हे तर काही वेळेस जाहिरातीमधून भरत जाधव यांचे छायाचित्र काढून टाकून त्या जागी १४९ शब्दांत वाक्ये टाकण्याची तयारीही लता नार्वेकर यांनी दाखविली. एवढेच नाही तर हे नाटक हाऊसफुल्ल जात असतानाही वाक्ये टाकून शब्दफेकीच्या या जाहिराती त्यांनी सुरू ठेवल्या होत्या.

हल्लीच्या काळात ‘सोशल मीडिया’ हे प्रभावी माध्यम नाटकवाल्यांसाठी उपलब्ध झाले आहे. या माध्यमामुळे नाटक एकाच वेळी आपण हजारो नव्हे तर लाखो लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे. ‘छापा काटा’ नाटकाच्या प्रसिद्धीसाठी या माध्यमाचा वापर करण्यात आला होता. ‘लव्ह बर्ड्स’ या सस्पेन्स थ्रीलर नाटकाचे प्रोमो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले होते. ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ या माध्यमांचाही प्रभावी वापर करून घेण्यात येत आहे. विशेषत: तरुण पिढी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी नाटकांकडे वळविण्यात हे माध्यम उपयुक्त ठरते आहे. काही वेळेस नाटकाला मिळालेले विविध पुरस्कार, मिळालेली विविध नामांकने यांचाही उल्लेख या जाहिरातींमधून आवर्जून केला जात आहे.

पुरुषोत्तम बेर्डे यांनीही त्यांच्या ‘टुरटुर’ नाटकासाठी स्वत: अशा प्रकारे जाहिराती केल्या होत्या. ‘टुरटुर’च्या यशात जाहिरातीमधील वाक्ये व शब्दफेकीचा मोठा वाटा आहे. नाटय़निर्मात्या लता नार्वेकरही स्वत: अशा प्रकारे जाहिराती करतात. त्यांच्या जाहिरातींमधून शाब्दिक कोटय़ा, ज्वलंत सामाजिक विषयावरील भाष्य तर कधी अन्य निर्माते, नाटक यांच्यावर केलेली टिप्पणीही असते. त्यांच्या ‘चारचौघी’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ या नाटकांच्या जाहिराती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या.

जाहिरातीचे हे तंत्र मराठी नाटय़निर्माते आणि नाटय़संस्थांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केले आहे. वृत्तपत्रात नाटकांच्या येणाऱ्या जाहिरातींवर सहज नजर टाकली तरी ते दिसून येते. प्रत्येक नाटय़निर्माता आपापल्या परीने नाटकाची जाहिरात अधिकाधिक आकर्षक आणि लक्षवेधी कशी होईल याची काळजी घेत असतो. काहीजण नाटकाच्या जाहिरातीसाठीही वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. ‘टुरटुर’ हे नाटक १९८३ मध्ये रंगभूमीवर सादर झाले. या नाटकाची जाहिरात एका दिवशी वेगळ्या पद्धतीने केली होती. ‘नाटकाच्या आजच्या दिवसाच्या जाहिरातीचे कात्रण कापून ते दिवसभर पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्यानंतर संध्याकाळी ती जाहिरात रंगीत झालेली पाहायला मिळेल,’ असे त्यात म्हटले होते. काही जणांनी तसे करूनही पाहिले. पण नंतर लक्षात आले की त्या दिवसाची तारीख ‘१ एप्रिल’ होती. संजय पवार लिखित-दिग्दíशत ‘ठष्ठ’ या नाटकाची जाहिरातही लक्ष वेधून घेणारी होती. नाटकाच्या नावाचे कुतूहल निर्माण करण्यात ही जाहिरात यशस्वी झाली होती. पुढे नंतर ‘ठरलेले लग्न मोडलेल्या मुलीची गोष्ट’ अशी ओळ ‘ठष्ठ’नाटकाच्या जाहिरातीत येऊ लागली.

नाटकाच्या जाहिरातींमध्ये शब्दरचना किंवा वाक्ये टाकली नाहीत तर नाटकाचा विषय काय आहे, ते प्रेक्षकांना कळत नाही. केवळ नाटकातील कलाकारांची छायाचित्रे जाहिरातीमध्ये टाकून उपयोग होत नाही. जाहिरातीमधील या वाक्यांचा नाटकाच्या बुकिंगसाठी किती फायदा होतो की होत नाही हा वेगळा विषय आहे. पण प्रेक्षकांना नाटकाकडे आकृष्ट करून घेण्यासाठी जाहिरातीमधील ही शब्दफेक नक्कीच उपयोगी पडते.

नाटकासाठी अशा जाहिरातींचा फायदा होतो

श्री चिंतामणी या माझ्या नाटय़संस्थेतर्फे मराठी व्यावसायिक रंगभूमीवर मी पदार्पण केले तेव्हा अन्य नामवंत नाटय़संस्था जोरात होत्या. जाहिरात कंपनीकडे काम देऊन जाहिरात करण्यासाठी पसेही तेव्हा माझ्याकडे नव्हते. त्यामुळे मी स्वत: जाहिराती लिहायला, करायला लागले. लोकांना त्या आवडायला लागल्या. त्या जाहिराती वाचून त्यावर चर्चा होऊ लागली आणि माझ्या नाटकांच्या ते पथ्यावर पडले. समाजात जे काही चालले आहे, त्याचे प्रतििबब मी वाक्यांमधून जाहिरातीद्वारे मांडले. प्रेक्षकांना नाटय़गृहापर्यंत घेऊन येण्यास त्याचा फार मोठा उपयोग झाला. याचमुळे मी प्रेक्षकांच्या घराघरात व मनामनात पोहोचले. राजकारण, क्रिकेटपासून ते सामाजिक ज्वलंत विषयावर मी जाहिरातीमधून टिप्पणी केली. काही वेळेस अत्यंत स्पष्टपणे लिहिण्याने काही जणांचे शत्रुत्वही पत्करले. पण मला जे वाटले, पटले ते मी लिहिले व त्याच्याशी ठाम राहिले व आजही आहे. लोकांच्या जे मनात आहे त्याला व्यक्त करण्याचे धाडस मी केले. त्यामुळे जाहिरातींमधील या शब्दफेकीचा फायदा होतोच होतो. फक्त या जाहिराती सर्जनशील, कलात्मक, सामाजिक भान जपणाऱ्या असाव्यात.

लता नार्वेकर, ज्येष्ठ नाटय़ निर्मात्या

उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी

नाटकांच्या जाहिरातीमधून अशा प्रकारे वाक्ये लिहून, विशिष्ट शैलीत शब्दफेक केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्या नाटकाबाबत उत्सुकता निर्माण होते. नाटकाचा विषय व आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविता येतो. ‘सुयोग’ नाटय़संस्थेच्या अनेक नाटकांच्या जाहिराती मी अशा प्रकारे केल्या आहेत. जाहिरातीसाठी वाक्ये लिहिली जातात तेव्हा त्याची तीव्रता कळत नाही, पण ती जाहिरात जेव्हा छापून येते तेव्हा ती अंगावर येते. जाहिरातीमधील वाक्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वाचे काम करतात.

अशोक मुळ्ये, ज्येष्ठ रंगकमी

काही जाहिराती..

  • आता मराठी ‘चॉकलेट’ हिरो म्हणजे एक्लेर पण रिच वाटतं –ठष्ठ
  • खेळकर भांडणाची आंबट गोड सुखात्मिका -सून सासू सून
  • रंगभूमीवर आलेल्या वेगळ्या फॉर्ममुळे शेवग्याच्या शेंगा ‘क्रिस्पी’ झाल्या -शेवग्याच्या शेंगा
  • जुन्या पिढीसाठी ‘आरसा’, नव्या पिढीसाठी ‘वारसा’- वाडा चिरेबंदी
  • रसिक प्रेक्षकांच्या पोटात शिरून गुदगुल्या करायला लावणारं अस्सल मालवणी कालवण –वस्त्रहरण
  • हरवलेल्या नात्यांचा शोध घेणारं एक कुटुंबवत्सल नाटक -फॅमिली ड्रामा
  • तमाम स्त्रियांना मायलेकी जगण्याचं बळ देणार. ‘जयहिंद’ नुसतं म्हणू नका त्याचं इमान राखा –मायलेकी
  • एक होती चिऊ, एक होता काऊ मन्याचे नाव घेत डोके नका खाऊ -एका लग्नाची गोष्ट
  • स्त्रीला समजून घ्यावं अस वाटणाऱ्या प्रत्येक पुरुषाने पाहावं असं नाटक -आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे