‘मी टू’ #MeToo चळवळीनंतर हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी चित्रपट मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याची जाहीर कबुली देण्यास सुरुवात केली. हार्वी वाइनस्टिनसारखे अनेक शोषण करणारे निर्माते जगभरातील चित्रपटसृष्टीत आहेत. ‘कास्टिंग काऊच’चा प्रकार आजही सर्रास सुरू आहे हे आजवर दबल्या आवाजात पुटपुटणाऱ्या तोंडातून बाहेर पडले. त्याचे पडसाद बॉलिवूडमध्येही उमटले. रणवीर सिंगपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यावर मतप्रदर्शन केलं. सध्या ‘राजी’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री आलिया भट्टनेही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. इंडस्ट्रीत स्ट्रगल करणाऱ्यांचा फायदा काही लोक घेतात, असं टीका तिनं केली.

‘माझ्या मते कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावर जेव्हाही बोललं जातं, तेव्हा आपोआपच वातावरण नकारात्मक होऊ लागतं. ही इंडस्ट्रीच वाईट आहे, असं लोक समजू लागतात. काम मिळवण्यासाठी अनेकांना वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. स्पर्धा इतकी वाढली आहे की प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी इथे खूप मेहनत घ्यावी लागते आणि स्ट्रगल करणाऱ्यांचा अशा वेळी काही जण फायदा घेऊ पाहतात. हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशात अशीच परिस्थिती आहे,’ असं ती म्हणाली.

वाचा : अखेर आलियासोबतच्या नात्याविषयी रणबीरने सोडलं मौन

कास्टिंग काऊचसारख्या प्रकरणांवर मौन न बाळगण्याचं आवाहन आलियाने केलं. त्याचप्रमाणे पालक आणि पोलिसांकडे याविषयी तक्रार करण्यासही तिने सांगितलं. नवोदित कलाकारांनी या क्षेत्रात येताना या गोष्टींचं भान बाळगणं, सतर्क राहणं गरजेचं असतं, असं मत तिने नोंदवलं.