‘प्राइम टाइम’मध्ये कोणतीही वाहिनी लावली तर माँजी, बहू, सासू माँ, दादीजी अशाच हाका कानावर पडतात. घरातली एक बिचारी सून किंवा मुलगी आणि तिला सतावण्याचा वसा घेतलेल्या घरातल्या बायकांचे मंडळ, त्यात एखाददुसरी साधी, देवभोळी आजी किंवा आई असे साधारण चित्र या मालिकांमध्ये असते. या बायकांनी भरलेल्या घरात कर्त्यां पुरुषांना एकतर सकाळी बॅग उचलून कामाला जायचे, सणाच्या दिवशी छान कुर्ता घालून चार ठिकाणी फिरायचे किंवा आभिनयाला वाव द्यायचाच असेल तर रागात येऊन बायकोचा हात धरून तिला घराबाहेर काढायचे यापलीकडे वाटय़ाला फार कमी काम येते. त्यात एखाद्याला खलनायकाचे काम मिळले तर चार भागांपुरते त्यांचे नशीब नक्कीच फळते. नव्याने येणाऱ्या मालिकांमध्ये मात्र सध्या पुरुषांची भुमिका बदलू लागली आहे. कित्येक मालिका या पुरुषांना डोळ्यासमोर ठेवून बनवल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे अगदी मोठय़ा प्रमाणात नाही, पण सध्या छोटय़ा पडद्यावर  ‘बेटों का जमाना’ येतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही.
* ‘बेटी’, ‘बहू’ला तोडीस तोड उत्तर देणारे ‘बेटे’, ‘जमाई’.
आतापर्यंत मालिका घरातील मुलगी किंवा सून यांच्या नजरेतून पाहिल्या जात होत्या. लग्न करुन सासरी आलेली सून आणि तिला सहन कराव्या लागणाऱ्या समस्या यांच्याभोवती मालिका फिरत होत्या. आता या लेकीसुनांना टक्कर देण्यासाठी मालिकेमधील ‘बेटे’ उतरले आहेत. सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या मालिकांपैकी ‘बिग मॅजिक’वरील ‘अजब गजब घरजमाई’, ‘झी वाहिनी’वरील ‘जमाई राजा’ या मालिकांमधून घरातील जावई त्यांच्या सासूबाईंच्या नाकीनऊ आणताना दिसत आहेत. तर नुकत्याच सुरू झालेल्या ‘हम है ना’ या मालिकेतून आई, बहिणी आणि बायको यांच्यात मेळ घालत, सर्व नाती सांभाळायची तारेवरची कसरत करणारा मुलगा दिसणार आहे. ‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘नादान परिंदे घर आ जा’मध्ये सीमेजवळ राहणाऱ्या एका सामान्य घरातील सैन्यातील मुलाची गोष्ट सांगितली होती. प्राइम टाइमवर दाखवल्या जाणाऱ्या या मालिकांमध्ये, मालिकेच्या यशाची जबाबदारी पुरुष व्यक्तिरेखेवर सोपवण्यात आली आहे. तसेच ‘कलर्स’वरील ‘मेरी आशिकी तुमसे’ ही मालिका नायकाचे मुके प्रेम आणि त्याचे बलिदान यावर आधारित आहे. याखेरीज ‘युद्ध’, ‘२४’ या मलिका अनुक्रमे महानायक अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित होत्या. ‘सोनी टीव्ही’चे प्रोग्रामिंग हेड अजय बलवणकर यांच्या सांगण्यानुसार, ‘आतापर्यंत कुटुंबाला एकत्र आणणारी सून किंवा मुलगी मालिकांमधून दाखवण्यात येत असे. त्यामुळे एखादा मुलगा कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी झटतो आहे, ही संकल्पना टीव्हीसाठी नवीन आहे आणि ती येत्या काही वर्षांमध्ये मालिकांमध्ये रुळताना दिसेल.’
* सास-बहू मालिकांमध्येसुद्धा पुरुष व्यक्तिरेखांचे वाढते स्थान
या मालिकांशिवाय नेहमीच्या सास-बहू मालिकांमध्येसुद्धा पुरुष व्यक्तिरेखांची भूमिका केवळ बघ्याची न राहता त्यांच्या भोवतीसुद्धा कथानक फिरू लागले आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘ये है महोबत्ते’मध्ये आपल्या मुलीची दुसरी आई म्हणून आलेल्या नायिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि तिला अडीअडचणीला मदत करणारा नायक दाखवण्यात आला आहे. तर ‘दिया और बाती’मध्ये आपल्या बायकोचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारा नायक दाखवला आहे. नायक-नायिकेच्या प्रेमावर आधारित ‘और प्यार हो गया’ आणि ‘प्यार का दर्द है’ या मालिकांमध्येसुद्धा नायिकेपेक्षा नायकाच्या दृष्टीने कथानक वळवले आहे. ‘गोष्ट चांगली असेल तर, ती लोकांना आवडतेच. त्यात एका जावयाच्या किंवा मुलाच्या दृष्टिकोनातून मालिकेला सादर केल्यामुळे घरात वावरताना स्त्रियांइतकीच मुलांनाही तारेवरची कसरत करावी लागते हेही लोकांच्या समोर येते’, असे ‘झी टीव्ही’चे प्रोग्रामिंग हेड नमित शहा यांनी सांगितले.
*विनोदी आणि पौराणिक मालिकांमधील पुरुषी वर्चस्व
‘बिग मॅजिक’ वाहिनीचे क्रिएटिव्ह हेड उदितांशू मेहतांच्या सांगण्यानुसार, ‘विनोदी मालिकांच्या संदर्भामध्ये अजूनही स्त्री व्यक्तिरेखांपेक्षा पुरुष कलाकारांचे वर्चस्व आहे. दैनंदिन मालिकांमध्येसुद्धा विनोदी अंगाचा वापर करून अजूनच गंमत आणता येते. मालिकांच्या कथानकामध्येसुद्धा यामुळे फरक पडतो.’ ‘चंद्रकांत चिपलूणकर सीडी बंबावाला’, ‘अकबर-बिरबल’, ‘चिडीयाघर’ या पुरुष व्यक्तिरेखांवर आधारित विनोदी मालिका टीव्हीवर गाजत आहेत. विनोदी मालिकांखेरीज पौराणिक मालिकासुद्धा काही अपवाद वगळता देवतांपेक्षा देवांच्या चरित्रावर जास्त आधारित असतात. आतापर्यंत महाभारत, रामायणापासून महादेव, कृष्ण, गणपती, हनुमान या पौराणिक व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी जास्त पसंत केले आहे.
*बदलता प्रेक्षकवर्ग आणि त्यांची बदलती मागणी
 मालिकांच्या प्रेक्षकवर्गामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. या प्रेक्षकवर्गाची पहिली पसंती ‘स्वयंपाकघरातील राजकारणाला’ आहे. त्यामुळे आतापर्यंत मालिकांमधून हे विषय मोठय़ा प्रमाणात हाताळले जात होते. पण, त्यापुढे जाऊन तरुण पुरुषवर्गाला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या नजरेतून गोष्ट सांगणाऱ्या मालिकांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे, उदितांशू मेहता यांनी सांगितले. त्यामुळेच सध्या या विषयावर आधारित मालिका येत असल्याचे ते म्हणाले. मालिकांच्या कथानकाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळत असल्याचे आणि नवीन विषय हाताळण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.