बॉलिवूड गायिका सोना मोहापात्र नेहमीच स्वत:ची मतं सामाजिक माध्यमांवर बेधडक आणि मोकळेपणाने मांडत असते.सिनेसृष्टीतील न पटणाऱ्या कलाकारांविरोधातदेखील तिने ट्विट करुन तिचं मत मांडलं आहे. तसंच ट्रोल करणाऱ्यांनाही ती तितक्याच स्पष्टपणे उत्तर देते. सध्या लॉकडाउन असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी गरजूंना मदत करत आहेत. मात्र तरीदेखील काही ट्रोलर्स कलाकारांना खोचकपणे किती मदत केली असे प्रश्न विचारताना दिसतात. असाच प्रश्न एका नेटकऱ्याने सोनाला विचारला. त्यावर तिने सडेतोड उत्तर देत मत मांडलं आहे.

‘मी  केलेल्या कोणत्याच मदतीचा गाजावाजा करत नाही. मला उगाच पब्लिसिटी स्टंट करायला आवडत नाही’, असं सडेतोड उत्तर सोनाने या नेटकऱ्याला दिलं आहे. बऱ्याच वेळा संकटकाळी कलाकारांनी गरजूंना किती मदत केली याचा जाब विचारणारा आणि त्यांना ट्रोल करणारा ठराविक वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. आतापर्यंत अनेक कलाकार यामुळे ट्रोलिंगचे शिकार झाले असून सोनालादेखील असाच खोचक प्रश्न विचारण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

‘मॅडम, करोनामुळे देशात सारेच त्रस्त आहेत.त्यामुळे थोडी आर्थिक मदत केली तर देशातील मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गातील सारेच नागरिक तुमचे ऋणी राहतील’, असं एका नेटकऱ्याने ट्विट करत सोनाला म्हटलं होतं. यावर सोनाने सडेतोड उत्तर दिलं.

‘करोनाच्या उपाययोजनांसाठी मी अगोदरच तीन खात्यांमध्ये मदत जमा केली आहे. पण मला त्याची प्रसिद्धी करायला आवडत नाही. अभिजित तुला जितकी शक्य असेल तितकी मदत कर आणि या जागरुक झालेल्या इतरांनीही हे करावं. मोदींचं समर्थन करणाऱ्यांना कोणत्याही बाबतीत राग व्यक्त करण्याचा परवाना नाही’,असं ट्विट सोनाने केलं आहे.

दरम्यान,सोना कायमच बेधडकपणे तिच मत मांडत असते. MeToo मोहिमेअंतर्गत संगीत दिग्दर्शक अनु मलिकवर स्त्रियांनी आरोप केल्यानंतरही सोनाने बेधडकपणे तिचं मत मांडलं होतं. त्यामुळे बऱ्याच वेळा ती वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते.