बॉलीवूडमध्ये सध्या नव्या जोड्या पाहायला मिळत आहेत. नुकताच आलेल्या ‘बार बार देखो’ या चित्रपटाद्वारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ ही जोडी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिसली. त्याआधी सोनाक्षी सिन्हाचा ‘अकिरा’ हा चित्रपट येऊन गेला. यामध्ये सोनाक्षीने एक सक्षम भूमिका साकारली होती. त्यानंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या जोडीची चर्चा केली जात आहे.
सिद्धार्थ आणि सोनाक्षीला ‘इत्तेफाक’ या चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. राजेश खन्ना आणि नंदा यांच्या १९६९ साली आलेल्या ‘इत्तेफाक’ चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक असणार आहे. त्या चित्रपटाची कथा एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित होती. चित्रपटाच्या रिमेकची घोषणा करण्यात आल्यापासून सिद्धार्थ आणि सोनाक्षी रोमान्स करताना रुपेरी पडद्यावर कसे दिसतील याबाबतची चर्चा केली जातेय. तसेच ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यामुळेही लोकांमध्ये सदर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण ‘इत्तेफाक’ चित्रपटात सिद्धार्थ आणि सोनाक्षी हे काही प्रेमीयुगुलाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. तर या चित्रपटाची कथा एका खूनाच्या अवतीभोवती फिरणारी आहे. अशा प्रकारचे चित्रपट आता बॉलीवूडमध्ये कमीच पाहावयास मिळतात. ‘इत्तेफाक’चे चित्रीकरण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरु होईल. एका मुलाखती दरम्यान सिद्धार्थला सोनाक्षीसोबत काम करण्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, मी सोनाक्षीसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण चित्रपटात आम्ही दोघ प्रेमीयुगुलाच्या रुपात दिसणार नाही. या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री असून मी सोनाक्षीसोबत रोमान्स करताना दिसणार नाही. तसेच या चित्रपटाविषयी सोनाक्षी म्हणाली की, चित्रटाच्या दिग्दर्शकांनी कथेत बरेच बदल केले आहेत. चित्रपटात तीन मुख्य भूमिका असून, याची कथा त्या तीन व्यक्तिंभोवती फिरताना दिसेल. या तिघांचाही एक भूतकाळ आहे. तसेच, त्यांच्याकडे खून करण्याचेही कारण आहे. त्यामुळे नक्की कोण खून करतं हे चित्रपटात पाहणे उत्कंठावर्धक राहिल.
दरम्यान, ‘अकिरा’ चित्रपटाच्यावेळी सिद्धार्थने एका व्हिडिओद्वारे सोनाक्षीला शुभेच्छा दिल्या होत्या. तर ‘बार बार देखो’ प्रदर्शित होण्याआधी सोनाक्षीने चित्रपटातील कतरिनाच्या लूकप्रमाणे वधू पोशाख परिधान करून सिद्धार्थला शुभेच्छा दिलेल्या.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2016 रोजी प्रकाशित
.. म्हणून मी सोनाक्षीसोबत रोमान्स करणार नाही- सिद्धार्थ मल्होत्रा
राजेश खन्ना आणि नंदा यांच्या 'इत्तेफाक' चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक असणार आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 12-09-2016 at 16:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha and sidharth malhotra are not romancing each other in ittefaq remake