अॅक्शनस्टार अक्षय कुमार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. परंतु अनेकदा या स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ देखील आली आहे. अक्षयच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. २०१२ साली अक्षयने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला कुठल्या प्रकारच्या अभिनेत्री आवडतात हा प्रश्न विचारला गेला होता. या प्रश्नावर अक्षयने दिलेले उत्तर आज सात वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आहे. हे उत्तर देताना त्याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे उदाहरण दिले होते, त्यामुळे अक्षयला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.

काय म्हणाला होता अक्षय कुमार?

“मी शुद्ध पंजाबी आहे. मी खात्या-पित्या घरातील आहे. त्यामुळे मला सोनाक्षी सिन्हा सारख्या खात्या पित्या घरातील अभिनेत्री आवडतात. मला झिरो फिगर असलेल्या अभिनेत्री आवडत नाहीत. कारण त्या रस नसलेल्या आंब्यासारख्या दिसतात.” असे उत्तर अक्षयने दिले होते. या उत्तरात त्याने सोनाक्षी सिन्हाच्या शरीराबाबत केलेला उल्लेख नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यामुळे त्यांनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान रिकामटेकड्या लोकांनी अक्षयला ट्रोल करणे थांबवावे, असे म्हणत सोनाक्षी सिन्हाने अक्षयचा बचाव करण्यास सुरुवात केली आहे.