अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये स्थिरावून आता बऱ्यापैकी काळ उलटलायं. त्यामुळे आगामी काळात आपल्याला व्यवसायिक यशाबरोबरच कलात्मक पातळीवर कस लागेल अशा चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सोनाक्षीने सांगितले आहे. ‘हॉलिडे- अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’ या आगामी चित्रपटातून अक्षय कुमार आणि सोनाक्षी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पहायला मिळतील. या चित्रपटाचे कथानक दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर आधारलेले असून सोनाक्षी यामध्ये एका महाविद्यालयीन तरूणीची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील काही दृश्यांसाठी सोनाक्षीने चक्क भारताचा प्रसिद्ध बॉक्सिंगपटू विजेंदर सिंगकडून बॉक्सिंगचे धडे घेतले आहेत. सैन्यदलातील एक जवान सुट्टीसाठी आपल्या घरी येतो. यावेळी त्याला आजुबाजूला सुरू असणाऱ्या अनेक अनधिकृत गोष्टी नजरेस पडतात, त्यानंतर या गोष्टींचा पुरता बिमोड करण्यासाठी हा सैनिक कशाप्रकारे आपले सर्वस्व पणाला लावतो याची कथा चित्रपटातून मांडण्यात आल्याचे सोनाक्षीने सांगितले. चित्रपटासाठी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्याचा अनुभव आपल्यासाठी अत्यंत आनंददायी होता, कारण; शालेय वयापासूनच आपल्याला खेळांची आवड असल्याचे सोनाक्षी सिन्हाने आवर्जून सांगितले.
भविष्यात कशाप्रकारचे चित्रपट करायला आवडतील याविषयी विचारले असता, ‘दबंग’, ‘रावडी राठोड’ यांसारख्या व्यवसायिक पातळीवर यशस्वी ठरलेल्या चित्रपटांबरोबरच ‘लुटेरा’ सारखे कलात्मकता आणि अभिनयाच्या पातळीवर कस पाहणाऱ्या चित्रपटांत काम करण्याची इच्छा सोनाक्षीने प्रदर्शित केली.