सध्या बॉलिवूडमध्ये जुन्या गाण्यांचं रिक्रिएशन करण्याचा ट्रेंड आला आहे. पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटात उषा मंगेशकर यांचं गाजलेलं ‘मुंगडा’ गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन वापरण्यात आलं. यावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नाराजी दर्शवली होती. अनेकांना ‘मुंगडा’ गाण्याचं नवीन व्हर्जन खटकलं होतं. यावर प्रथमच सोनाक्षी सिन्हानं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘मला देखील जुनंच गाणं खूप जास्त आवडलं होतं’, असं सोनाक्षी म्हणाली. ‘त्याकाळच्या प्रसिद्ध गाण्यांचं रिक्रिएशन करण्याचा सध्या ट्रेंड आहे. पण मूळ गाणं आणि नवीन गाणं यात तुलना होऊच शकत नाही. हे नवीन पीढीसाठी तयार करण्यात आलेलं गाणं आहे’ अशा शब्दात सोनाक्षीनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘मुंगडाच्या रिक्रिएट व्हर्जनला मी न्याय देऊ शकते असं निर्मात्यांना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी माझी निवड केली. ‘ असंही सोनाक्षी म्हणाली. काही दिवसांपूर्वी मुंगडाचं रिक्रिएट व्हर्जन लाँच करण्यात आलं होतं ते ऐकल्यानंतर लता मंगेशकर यांनी या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनवर नाराजी व्यक्त केली होती.