सोशल मीडियावर ट्रोलिंग हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्यांपेक्षा सेलिब्रिटींना या ट्रोलिंगचा जास्त सामना करावा लागतो. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने याविरोधात एक मोहीम सुरू केली आहे. ‘अब बस..’ असं या मोहिमेचं नाव असून ट्रोलिंगविरोधात तिने आवाज उठवला आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती याविषयी म्हणाली, “स्क्रीनमागे लपून वाटेल ते कमेंट आपण करू शकतो असं लोकांना वाटतं. त्यांना कोणीच ओळखत नाही असंही त्यांना वाटतं. सोशल मीडियावर लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला जातोय. याविरोधात आम्ही लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्रोलिंग करणाऱ्यांविरोधात कारवाईसुद्धा केली जाऊ शकते हे आम्ही त्यांना सांगणार आहोत.”

यावेळी लॉकडाउनदरम्यान ट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचंही सोनाक्षीने नमूद केलं. “ट्रोलिंगविरोधात मोहिम हाती घेतल्यानेही मला ट्रोल केलं गेलंय. लोकं काहीही विचार न करता त्यांचा राग सोशल मीडियावर व्यक्त करतात. आता लॉकडाउनमध्ये याचं प्रमाण खूप वाढलंय. रिकामटेकड्या लोकांमुळे ट्रोलिंगचं प्रमाण वाढलंय आणि सोशल मीडियावर खूप नकारात्मकता पसरली आहे”, असं ती म्हणाली.

सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मकतेपासून लांब राहण्यासाठी सोनाक्षीने तिचा ट्विटर अकाऊंट बंद केला. त्यानंतर आता तिने ट्रोलिंगविरोधात मोहिम सुरू करण्याचा निर्धार केला आहे.