03 December 2020

News Flash

‘भूमिकेसाठी पूर्वतयारी करणे वगैरे मला जमत नाही’

अमुक एका पद्धतीने अभिनय करणं आपल्याला जमत नाही, असं ती सहज सांगून जाते.

सोनाक्षी सिन्हा

बॉलीवूडमध्ये सध्या परफेक्शनचा आग्रह सर्वच कलाकारांचा असतो. त्यामुळे व्यक्तिरेखेनुसार लुक, स्वभाव, त्याचे कलागुण, व्यवसाय, सामाजिक स्तर अशा अनेक शारीरिक-मानसिक व्यक्तित्वाचा अभ्यास करून त्या पद्धतीने परफेक्ट भूमिका साकारण्याचा प्रयत्न तरुण फळीतील कलाकारांपासून मुरलेल्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत प्रत्येक जण करताना दिसतो. अभिनेत्रीही याला अपवाद नाहीत. एक तर सातत्याने बॉलीवूडच्या नायिकांना मध्यवर्ती भूमिका असलेले चित्रपट करायला मिळत आहेत. त्यामुळे त्याचे सोने करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी भूमिका साकारण्यावर त्यांचाही कल असतो. मात्र ‘दबंग’ गर्ल म्हणून ओळख मिळवत ‘अकिरा’सारखा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट लीलया पेलणारी सोनाक्षी सिन्हा याला अपवाद ठरली आहे. अमुक एका पद्धतीने अभिनय करणं आपल्याला जमत नाही, असं ती सहज सांगून जाते.

सोनाक्षी सध्या ‘नूर’ चित्रपटामुळे चच्रेत आहे. यात तिने पत्रकाराची भूमिका केली आहे. पत्रकारितेच्या व्यवसायातील आव्हाने, या क्षेत्रात शिरल्यानंतर एका तरुणीत झालेले बदल, या क्षेत्रात मोठे होण्याचे स्वप्न बाळगणारी तरुणी ते ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी धडपडणारी पत्रकार असे वेगवेगळे पलू या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. मी आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपकी नूर ही अशी व्यक्तिरेखा आहे जिच्याशी मी स्वत:ला सहज जोडून घेऊ शकते. मुळात मी अशी अभिनेत्री आहे जी कॅमेरा रोल झाला की सहज भूमिकेत शिरते. त्या भूमिकेसाठीची पूर्वतयारी किंवा अमुक एका पद्धतीनेच अभ्यास करून भूमिकेची तयारी हे काही मला जमत नाही. मी भूमिकेविषयी दिग्दर्शकाशी सविस्तर बोलते, त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे समजून घेऊन एकदा मला व्यक्तिरेखा पटली की मी शंभर टक्के तिला न्याय देण्याचा प्रयत्न करते, असे सोनाक्षीने सांगितले. नूरच्याच बाबतीत बोलायचं तर आपण कोणीही तिच्या जागी स्वत:ला पाहू शकतो, कारण त्या परिस्थितीतून कधी ना कधीतरी आपणही गेलेलो आहोत. त्यामुळे नूरची व्यक्तिरेखा साकारताना मजा आल्याचे सांगणारी सोनाक्षी आणखी एक गमतीदार किस्सा सांगते. चित्रपटात नूर पत्रकार आहे, त्यामुळे वर्तमानपत्रांशी तिचा गाढा संबंध आहे. मात्र प्रत्यक्षात वर्तमानपत्रं सातत्याने वाचणे हे आपले काम नोहे, असंच ती सांगते. आम्हाला लहानपणी वर्तमानपत्र वाचण्याची सक्ती होती. वर्तमानपत्राच्या वाचनाने शब्दसंग्रह वाढतो, त्यामुळे आईबाबांनी वाचनाची शिस्त लावली होती. मात्र तरीही वर्तमानपत्र रोजच्या रोज वाचणं आपल्याला आजही शक्य नसल्याचं तिने गंमतीने सांगितलं.

फार कमी वेळात सोनाक्षीने ‘दबंग’ ते ‘फोर्स 2’, ‘अकिरा’ असा पल्ला गाठला आहे. याचं श्रेय मी माझ्या दिग्दर्शकांना देईन, असं ती म्हणते. त्यांनी मला वेगवेगळ्या भूमिका दिल्या. मीही चुकांमधूनच शिकत गेले, माझ्या अभिनयात सुधारणा करत गेले, असं सांगणारी सोनाक्षी सध्या एकापाठोपाठ एक नायिकाप्रधान चित्रपट करते आहे. मात्र हा चित्रपट नायिकाप्रधान तो नायकाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट अशा पद्धतीने भेदभाव करणं चुकीचं असल्याचं ती ठामपणे सांगते. आपण सगळे कलाकार आहोत आणि कलाकाराने त्याच्या वाटय़ाला आलेली प्रत्येक भूमिका चोख बजावली पाहिजे. मग तो चित्रपट नायिकाप्रधान असो किंवा नायकप्रधान त्याने काहीही फरक पडत नाही. त्या गोष्टीचा आशय काय आहे हे महत्त्वाचं ठरतं, असं ती म्हणते. खरं सांगायचं तर आम्ही सगळेच कलाकार भाग्यवान आहोत, कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळते आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की आपण जाणीवपूर्वक हा नायकाचा, तो नायिकेचा असं म्हणणं सोडून दिलं पाहिजे, अशी ठाम भूमिकाही तिने मांडली.

‘नूर’ची कथा मुंबईच्या पाश्र्वभूमीची असल्याने सगळं चित्रीकरण इथे झालेलं आहे. मात्र या चित्रपटामुळे मुंबईतही अशा कित्येक ठिकाणी फिरायची संधी मिळाली जिथे एरव्ही कधीही जाणं शक्य झालं नसतं, असं ती म्हणते. ‘नूर’पाठोपाठ १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाच्या रिमेकमध्येही ती काम करते आहे. ‘इत्तेफाक’ रहस्यमय चित्रपट आहे. यश चोप्रांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात राजेश खन्ना, नंदा आणि मदन पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. मूळ चित्रपट आपण पाहिलेला नसल्याने आपण पूर्णपणे नवीन विषय म्हणूनच त्यात काम करत असल्याचे तिने सांगितले. बी. आर. चोप्रा यांनी तेव्हा या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता त्यांचा नातू अभय चोप्रा हा चित्रपट पुन्हा करत असून यात सोनाक्षी नंदाच्या भूमिकेत असून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर तिची जोडी जमली आहे. सिद्धार्थबरोबर ती पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. शिवाय, सध्या सोनाक्षी ‘नच बलिए’ या ‘स्टार प्लस’वरील नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोची परीक्षक म्हणून काम पाहते आहे.

याबद्दल बोलताना सोनाक्षीने आधी ‘इंडियन आयडॉल’ची परीक्षक म्हणून काम पाहिले होते. नृत्यावर आधारित शोमध्ये परीक्षक म्हणून पहिल्यांदाच काम करत असल्याचं तिने स्पष्ट केलं. गाण्यावरचा रिअ‍ॅलिटी शो केला तेव्हा तो लहान मुलांसाठीचा होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा होता. इथे या शोमध्ये पहिल्यांदाच जोडप्यांची नृत्यकला पाहायला मिळते आहे. त्यांची ऊर्जा, उत्साह, एकच नृत्यप्रकार साकारण्यासाठी त्यांचे आपसात असलेले सहकार्यच त्यांना कसं उपयोगी पडतं, अशा अनेक गोष्टी परीक्षकाच्या खुर्चीवरून अनुभवायला मिळत असल्याचंही तिने सांगितलं. सोनाक्षीबरोबर दिग्दर्शक मोहित सुरी आणि नृत्यदिग्दर्शक टेरेन्स हे दोघेही परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. सोनाक्षी समोर असली की ‘दबंग 3’चा विषय निघतो. मात्र आपण तिसऱ्या सिक्वलमध्ये आहोत की नाही, याचं स्पष्ट उत्तर तिने दिलेलं नाही. अरबाज खानने तिसऱ्या भागात कुण्या नवीन अभिनेत्रीची वर्णी लागणार असल्याचे सूतोवाच नुकतेच केले आहे. सोनाक्षीच्या प्रेमप्रकरणाचीही चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे. तिने मात्र अशी कोणतीही शक्यता धुडकावून लावली आहे. मला स्वत:ला माझा जोडीदार कसा असेल, याचं उत्तर मिळालेलं नाही, तर मी कुठून प्रयत्न करणार, असं सांगणारी सोनाक्षी प्रत्येक चित्रपटातील भूमिकेत स्वत:ला शंभर टक्के झोकून देते आहे हे विशेष!

आपण सगळे कलाकार आहोत आणि कलाकाराने त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका चोख बजावली पाहिजे. मग तो चित्रपट नायिकाप्रधान असो किंवा नायकप्रधान. त्याने काहीही फरक पडत नाही.  गोष्टीचा आशय काय आहे हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे आता वेळ आली आहे की आपण जाणीवपूर्वक हा नायकाचा, तो नायिकेचा असं म्हणणं सोडून दिलं पाहिजे.

सोनाक्षी सिन्हा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 3:02 am

Web Title: sonakshi sinha talk about role in movie noor
Next Stories
1 गोरे रंग पे ना इतना..
2 जाहिरातीतील  समाजभान
3 आखूडपट!
Just Now!
X