हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट दोन्हींकडे काम करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आणखी एक पाऊल पुढे टाकत छोटय़ा पडद्यावरही प्रवेश करायचे ठरवले आहे. आत्तापर्यंत तरूण फळीतील अभिनेत्रींपैकी कोणीही छोटय़ा पडद्यावर येण्याची घाई दाखवलेली नाही. सोनाक्षी मात्र कुठलाही विचार न करता ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’ या रिअ‍ॅलिटी शोची परीक्षक म्हणून लोकांसमोर येणार आहे.
परीक्षक म्हणून छोटय़ा पडद्यावर येण्याबद्दल सोनाक्षी एकदम खूष आहे. तिने स्वत:च ट्विटरवर ही वर्दी दिली आहे. ज्युनिअर्सचा सुरेल संग्राम जोखण्यासाठी शॉटगन ज्युनिअरचा छोटय़ा पडद्यावर प्रवेश.. अशा शब्दांत तिने आपल्या टीव्हीवरच्या पदार्पणाची खबर चाहत्यांना दिली आहे. सोनाक्षीने इंडियन आयडॉल ज्युनिअरसारख्या रिअ‍ॅलिटी शोची निवड को केली?, हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, तिचा चुलबुला, खटय़ाळ स्वभाव पाहता तिने या शोची निवड करणं हे स्वाभाविक आहे.
या शोची परीक्षक म्हणून अवतरणारी सोनाक्षी छोटय़ा पडद्यावर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान, हृतिक रोशन, अक्षय कुमार, गोविंदा या अभिनेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. मात्र, गंमत म्हणजे आपल्या चित्रपट कारकिर्दीला प्राधान्य देणाऱ्या तिच्याबरोबरच्या किंवा अगदी तिच्या आधीच्या अभिनेत्रींनीही छोटय़ा पडद्यावर येणे आजवर टाळले आहे. मात्र, सोनाक्षीबरोबरच्या दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा ते आत्ताच्या अलिया भट, श्रद्धा कपूर यांच्यापैकी कोणीही छोटय़ा पडद्यावर येण्याचं धाडस केलेलं नाही. अपवाद फक्त प्रियांका चोप्राचा. प्रियांकाने ‘खतरों के खिलाडी’च्या एका पर्वाचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर परीक्षक म्हणून येणारी सोनाक्षी ही दुसरी अभिनेत्री म्हणता येईल.