सोनी वाहिनीवर सुरु असलेला अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ पर्व ११ हा शो सध्या चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळे शो कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच केबीसीच्या ११व्या पर्वाला त्यांचे दोन करोडपती मिळाले. नुकताच या शोमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने हजेरी लावली. हॉट सीटवर बसलेल्या रुपा देवी यांना मदत करण्यासाठी सोनाक्षीला पार्टनर म्हणून बोलण्यात आले होते. दरम्यान सोनाक्षीने रुपा यांना मदत केली मात्र एका सोप्या प्रश्नावर अडलेल्या सोनाक्षीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.
रुपा देवी यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. त्यामुळे त्यांना इतर स्पर्धकांपेक्षा केबीसीमध्ये खेळणे थोडे कठिण झाले होते. म्हणून या स्पर्धेसाठी त्यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची पार्टनर म्हणून निवड केली. सोनाक्षीने अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देत रुपा यांची मदत केली. मात्र अमिताभ यांनी विचारलेल्या रामायणातील प्रश्वाचे उत्तर सोनाक्षीने पटकन दिले नसल्यामुळे नेटकऱ्यांनी तिची फिरकी घेतली आहे.
‘रामायणानुसार हनुमानाने कोणासाठी संजीवनी औषध आणले होत’ असा प्रश्न सोनाक्षीला विचारला होता. या प्रश्नासाठी ‘A- सुग्रीव, B- लक्ष्मण, C- सीता आणि D-राम’ हे पर्याय दिले होते. पण या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाक्षीचे तोंड पाहण्यासारखे होते. तिने थोडा विचार केला आणि लाइफलाईनचा वापर केला. सोनाक्षीने इतक्या सोप्या प्रश्नासाठी लाइफलाईनचा वापर केल्यामुळे नेटकऱ्यांनी सोनक्षीवर निशाणा साधला आहे.
सोनाक्षीला ट्रोल करत नेटकऱ्यांनी ‘अनन्या पांडे आणि आलिया भट्टला आणखी एक टक्कर’, ‘आत्ताच्या स्टार किड्सना आपल्या संस्कृतीची माहिती नाही’ असे म्हटले आहे.
इतकच नव्हे तर अमिताभ यांनी देखील सोनाक्षीची फिरकी घेतली आहे. सोनाक्षीच्या वडिलांचे नाव शत्रुघ्न, तिन्ही काकांची नावे राम, लक्ष्मण आणि भरत आहेत. एवढच नव्हे तर त्यांच्या घराचे नाव रामायण असे आहे. सोनाक्षीच्या भावांची नावे लव आणि कुश आहे. तरीही सोनाक्षीला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही असे अमिताभ म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2019 3:20 pm