सलमान खानचा ‘भारत’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सलमानच्या आईची भूमिका साकारली आहे. सोनाली खरंतर सलमानपेक्षा ९ वर्ष लहान आहे. याआधीही सोनालीने ‘मिशन काश्मीर’ या चित्रपटात हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. हृतिकही तिच्यापेक्षा १ वर्ष मोठा आहे.

न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली की, “मी ही भूमिका योग्यप्रकारे निभावू शकेन की नाही याबाबत मी जरा साशंक होते. अलीला भेटल्यानंतर या सगळ्या शंका निघून गेल्या. अलीने माझ्यावर खूप विश्वास दाखवला. माझा लूक नक्की कसा असेल हे मला कळत नव्हतं. मी सलमानसोबत पहिल्यांदाच काम करत होते. मला स्वत:च्या लूकबाबत सांगायला आवडत नाही. मी टिमच्या रिसर्चवर विश्वास ठेवते. मी फक्त भूमिकेमध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करते.”

सोनालीने आतापर्यंत खूप विविध भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदीतही तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. भारतमधील भूमिकेबाबत बोलताना सोनाली म्हणाली की, “मी वयाचा विचार नक्कीच केला. माझ्या करीयरच्या सुरुवातीपासूनच मी विविध भूमिका केल्या आहेत. माझ्या पहिल्या चित्रपटात मी झाडाची भूमिका केली होती. दायरामध्ये मी मुलाची भूमिका केली.

‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.