मागच्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ‘लाईफ ओके’ वाहिनीच्या ‘लौट आओ त्रिशा’ आणि ‘अजीब दासताँ है ये’ या दोन मालिकांमधून भाग्यश्री आणि सोनाली बेंद्रे या बॉलीवूड अभिनेत्रींनी मालिकांच्या विश्वामध्ये पाऊल टाकले होते. नुकतेच सोनाली बेंद्रेने एकता कपूरच्या मालिकेतून काढता पाय घेतल्याचे वृत्त ताजे असतानाच आता भाग्यश्रीनेही मालिकेतून प्रेक्षकांची रजा घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
जुलै महिन्यामध्ये ‘मिसिंग’ या स्पॅनिश मालिकेवर आधारित ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेतून अपहरण झालेल्या त्रिशाच्या आईच्या मध्यवर्ती भूमिकेतून भाग्यश्रीने छोटय़ा पडद्यावर पुनरागमन केले होते. तब्बल १६ वर्षांनंतर अभिनय क्षेत्रामध्ये परतल्यामुळे भाग्यश्रीच्या या मालिकेबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनामध्ये उत्सुकता होती. नेहमीच्या सास-बहू मालिकांऐवजी गडद छटा असलेल्या वेगळ्या विषयांच्या मालिका निवडण्याच्या तिच्या धाडसाचे कौतुकही झाले. पण सुरुवातीच्या काळापासूनच मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये मागेच होती. त्यात मालिकेचे आगामी कथानक न आवडल्यामुळे कराराची मुदत संपली नसतानाही भाग्यश्रीने या मालिकेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेमध्ये तिची मध्यवर्ती भूमिका होती आणि तिच्या जागी तितकी सक्षम अभिनेत्री आणता येणे शक्य नसल्याने मालिकेतील आगामी भागामध्ये तिच्या पात्राचा खूुन होताना दाखवत तिच्या पात्राचा प्रवास थांबवण्यात येणार आहे. नुकतेच या भागाचे चित्रीकरणही पूर्ण झाले असल्याने भाग्यश्रीच्या निर्णयामध्ये बदल होण्याची आशाही मावळली आहे.
तर दुसरीकडे सोनाली बेंद्रे हे नाव एक परीक्षक म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये छोटय़ा पडद्याला परिचयाचे झाले आहे. पण मागच्या वर्षी एकता कपूरच्या ‘अजीब दासताँ है ये’ या मालिकेतून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेमध्ये नायिकेच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेसाठी बालाजी टेलिफिल्म्सशी तिने केलेला करार संपुष्टात आला आहे आणि सध्या तरी हा करार वाढवण्याबाबत तिला कोणतीही विचारणा न झाल्याचे तिने मराठी चित्रपटांकडे आपला मोहरा वळवल्याचे तिच्या वतीने सांगण्यात आले आहे. पण या मालिकेचे कथानक तिच्या पात्राभोवतीच गुंफले असल्याने तिच्या जागी त्या ताकदीचा नवा चेहरा आणणे निर्मात्यांनाही शक्य नाही. त्यामुळे स्वत: एकता कपूरने सोनालीशी करार वाढवण्याबाबत बोलणी सुरू केल्याचे वाहिनीतर्फे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांचे स्वरूप मर्यादित भागांचे असल्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये या संपणार आहेत. अशा वेळी या दोन्ही मालिकांमधून मुख्य पात्रांचे जाणे, वाहिनीसाठीसुद्धा हा धोक्याचा इशारा आहे.

मी मालिकेमधून पुनरागमन करणार, हे कळल्यावर माझ्या चाहत्यांना माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण मालिकेचे कथानक पुढे जात असताना माझ्या पात्रामध्ये फक्त रडण्याखेरीज फारसे काही करण्यासारखे उरले नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे निर्मात्यांशी चर्चा करून या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला आहे.
-भाग्यश्री