एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देत आहे. या आजारातून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी ती सध्या न्यूयॉर्क येथे उपचार घेत आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मागच्या २ दिवसांपासून सोनाली बेंद्रेचा मृत्यूची अफवा पसरत आहे. त्यावर सोनालीचा पती गोल्डी बहल याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशा चुकीच्या वागणुकीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

नुकतेच भाजपाचे आमदार राम कदम यांनी एका ट्विटद्वारे सोनालीला श्रद्धांजली वाहिली होती. कोणतीही शहानिशा न करता अशाप्रकारचे ट्विट केल्यामुळे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर सर्वांनी सडकून टीका केली होती.

‘मी सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा उपयोग जबाबदारीने करा. अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच पसरवूही नका. विनाकारण आपण लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवतो’ असे असे बहल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर ४ दिवसांपूर्वीच त्यांनी सोनालीची तब्येत स्थिर असून कोणत्याही त्रासाशिवाय तिचा इलाज सुरू असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर सोनालीच्या मृत्यूच्या बातम्या वेगाने पसरल्या होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असल्याचे दिसत होते. न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना सोनालीने आपले केस कापल्याचे किंवा आणखीही काही फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अनेकदा शेअर केले होते. तर आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे असणारे आपले कुटुंबिय आणि जवळच्या लोकांचे तिने सोशल मीडियाद्वारे आभारही मानले होते.