कठीण काळात एखाद्याने आपल्यासाठी केलेली प्रार्थना, मदत किंवा दिलेली साथ ही नेहमीच मोलाची ठरते. एखाद्याला ज्या आधाराची गरज असते, तो आधार देण्यासाठी जेव्हा हजारो, लाखो हात पुढे येतात तेव्हा कृतज्ञतेच्या भावनेसोबतच लढण्यासाठी आपसूकच ताकद येते. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आपल्या आईच्या पाठीशी खंबीर उभा राहणाऱ्या सर्वांसाठी सोनाली बेंद्रेच्या मुलाने भावनिक पोस्ट लिहिली आहे. इन्टाग्रामवरील या पोस्टमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

सोनाली बेंद्रेचा मुलगा रॉकी बहल याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याभोवती प्रकाशाची एक रिंग पाहायला मिळत आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्याभोवती प्रकाशाचं एक वलय तयार केलं आहे. मला साथ देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो,’ अशी पोस्ट त्याने लिहिली.

वाचा : वादानंतर चूक सुधारली, ‘नमस्ते इंग्लंड’चा नवीन पोस्टर प्रदर्शित

कॅन्सरग्रस्त सोनालीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीने दिली. ज्यामुळे चाहत्यांमध्ये काहीसा आनंद पाहायला मिळाला होता. न्यूयॉर्कमध्ये सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोनाली लवकरात लवकर बरी होऊन मायदेशी परतावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत.