प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिला झालेल्या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये होती. परंतु आता लवकरच ती मायदेशी परतणार आहे. नुकतीच सोनालीने याबाबत एक इन्स्टाग्राम पोस्ट केली असून आपल्या देशात येणे हे तिच्यासाठी किती खास आहे हे तिने सांगितले आहे. काही काळ विश्रांती घेऊन ती पुन्हा पुढील उपचारांसाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचेही तिने यामध्ये म्हटले आहे. सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला असून तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतरही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याने ती ठराविक काळाने काही पोस्ट करत असते.

आपल्यावरील उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता आपल्याला मायदेशात जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे असे सोनालीने या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या घरापासून दूर न्यूयॉर्कमध्ये राहताना तिची मानसिक स्थिती कशी झाली याबद्दल तिने लिहीले आहे. मात्र या अंतराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. आता मी घरी येत असून मला होत असलेला आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही असेही ती पुढे म्हणते. आपला परिवार आणि मित्रमंडळींना भेटणे ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या आजाराशी झुंज देत असताना सोनालीने स्वत:ला अतिशय सकारात्मक ठेवल्याचे आपल्याला तिच्या सगळ्याच पोस्टमधून वारंवार दिसून आले आहे. या पोस्टमध्ये सोनाली म्हणते, ”हा लढा संपलेला नाही, पण मी आनंदी आहे आणि आता मिळत असलेल्या ब्रेकही अतिशय छान असेल.” या पोस्टसोबत सोनालीने आपला एक फोटोही शेअर केला आहे. नुकतेच दिवाळी सेलिब्रेशन केल्याचा तसेच आपल्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल गोल्डी बहलसोबतचा फोटो सोनालीने शेअर केला होता. त्यामुळे आता सोनालीचे चाहते आणि नातेवाईक आणि मित्रमंडळी तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.