फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरने नावात बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. आता आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारू असं म्हणत सोनालीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सोनाली म्हणाली, “आपण आशिया खंडात राहतो, आपण भारतात राहतो. आपल्या मातीशी, आपल्या हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग, वर्ण आहे. आपणा सर्वांना विदेशी गोरेपणाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे गेली अनेक वर्षे आपण आपल्या रंगाला नाकारतो आहे. त्यामुळे असे वेगवेगळे प्रयोग स्वत:ला गोरं करण्यासाठी आपण करत आहोत. पण आता याला आळा बसेल आणि आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारू.”

“आपल्याला नेहमीच असं वाटतं की कलाकारांना त्यांच्या रंगाचा न्यूनगंड असेल. पण त्याहीपेक्षा सामान्य व्यक्तीला सुंदर असण्याचा, गोरं दिसण्याचा जो न्यूनगंड आहे तो आता फेअर हा शब्द काढून टाकल्याने नक्कीच कमी होईल अशी आशा आपण करूया,” असं ती पुढे म्हणाली.

गोरं होण्यासाठी या क्रीमचा वापर करा अशी जाहिरात करत असल्याने वारंवार फेअर अॅण्ड लव्हली ब्रॅण्डवर टीका झाली आहे. जाहिरातीमधून रंगभेद होत असल्याची टीकाही वारंवार झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी याच कारणामुळे याची जाहिरात करण्यास नकारही दर्शवला होता. त्यामुळे अखेर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.