अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्ष होत आहेत. हत्येप्रकरणी सीबीआयने दोन मारेकऱ्यांना अटक केली असली तरी अद्याप सूत्रधार मोकाटच आहे. तपासाला गती मिळण्याची मागणी अनेकदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी केली. तर दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही..येणार नाही असं म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निषेध व्यक्त केला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून सोनालीने संताप व्यक्त केला आहे. ‘आयुष्यात अनेक वेळा अपयश आलं. हाती आलेला डाव सोडून द्यावा लागला. हरतानाही मनाला काय शिकता आलं ते बजावलं. पण नरेंद्र दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही..येणार नाही..निषेध,’ असं तिने ट्विटमध्ये लिहिलं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनाला सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता अभिवादन सभा घेण्यात आली. 2013 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यानंतर भाजप, सेना महायुतीचे म्हणजेच उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले. या दोन्ही सरकारमध्ये नेत्यांची डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्याचे दिसून येत आहे, अशी खंत डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी व्यक्त केली.