News Flash

Sonam Kapoor birthday : ‘वजन’दार ते ‘खुबसूरत’पर्यंतचा सोनमचा प्रवास

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिचं वजन तब्बल ८६ किलो इतकं होतं.

सोनम कपूर Sonam Kapoor birthday

गेल्या काही वर्षांपासून सेलिब्रिटींच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत एका नव्या पर्वाची सुरुवात केली. यातीलच चर्चेतलं एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर Sonam Kapoor. सोनमच्या एकंदर वागण्याबोलण्याचा अंदाज आणि फॅशन जगतातील तिचा वावर पाहता बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणूनही ती नावारुपास आली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत तिने स्वत:चं स्थान निर्माण केलं. अशा या ग्लॅमरस अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. सोनमच्या वाढदिवसानिमित्त तमाम चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तर आपल्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात काही गोष्टी..

९ जून १९८५ रोजी मुंबईतल्या चेंबूर इथं सोनमचा जन्म झाला. जुहू इथल्या आर्यविद्यामंदिर शाळेत तिने शिक्षण पूर्ण केलं. शालेय जीवनापासूनच तिला बास्केटबॉल आणि नृत्याची खूप आवड आहे. जॅज आणि कथ्थकचं तिने प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन इथून तिनं पदवीचं शिक्षण घेतलं.

अनिल कपूर हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलं तरी सोनमला बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागला. कुटुंबातले बरेज जण या इंडस्ट्रीत काम करत असताना तिने त्यांचा स्वत:च्या करिअरसाठी कधीच वापर करून घेतला नाही. संजय लीला भन्साळी यांची असिस्टंट म्हणून ती सुरुवातीला काम करत होती. ‘ब्लॅक’ या चित्रपटासाठी तिने त्यांच्यासोबत काम केलं आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिचं वजन तब्बल ८६ किलो इतकं होतं. बरीच मेहनत घेत, वर्कआऊट करत तिने हे वजन कमी केलं आणि ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. यामध्ये रणबीर कपूरसोबत तिने भूमिका साकारली. पण अपेक्षित यश तिला मिळालं नाही.

२००९ मध्ये ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील ‘मसक्कली’ सोनम अनेकांनाच भावली. पण बॉक्स ऑफीसवर हा चित्रपटसुद्धा दणक्यात आपटला. ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र इथेही तिला अपेक्षित यश मिळालं नाही. पण फॅशन जगतात तिचा वावर उल्लेखनीय ठरत होता.

‘थँक्यू’, ‘प्लेअर’ असे एकानंतर एक सोनमचे चित्रपट फ्लॉप ठरू लागले. तिच्या अभिनय कौशल्यावर प्रश्न निर्माण होऊ लागले. अखेर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रांझना’ चित्रपटाने तिच्या विस्कटलेल्या करिअरची घडी बसवली असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘नीरजा’ हा चित्रपट तिच्यासाठी मैलाचा दगड ठरला. अभिनय आणि फॅशन विश्वात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या सोनमने नुकतंच प्रियकर आनंद अहुजाशी लग्न केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 11:04 am

Web Title: sonam kapoor birthday today here are some unknown facts about fashion diva
Next Stories
1 ..अन् ‘दस का दम’च्या सेटवर अनिल कपूरने मागितली जाहीर माफी
2 पँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर
3 ‘क्वांटिको’मधील हिंदू टेरर प्लॉटवरून हॉलिवूड निर्मात्याची दिलगिरी
Just Now!
X