कंगना राणावतने सुरू केलेली घराणेशाहीवरची चर्चा सतत या ना त्या कारणाने पुन:पुन्हा आपली नांगी वर काढत असते. बॉलीवूडमध्ये आताची एक फळी ही ‘स्टार’ मुलामुलींचीच असल्याने आतले आणि बाहेरचे हा वाद या ना त्या कारणाने रंगत असतो. सध्या दोन्ही पद्धतीच्या कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासाठी वाव मिळत असल्याने तर या वादाला धार चढली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये घराणेशाही कलाकारांच्या मुलांसाठी किती फायद्याची असते हे त्यांना सातत्याने ऐकावंच लागतं. यावर खरोखरच ज्यांना अभिनयाचा वारसा घरातून मिळाला आहे ते सध्याचे नायक-नायिका आपापल्या परीने या मुद्दय़ावर उत्तरं देत असतात. पण नेहमीच सडेतोड बोल ऐकवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनम क पूरने या मुद्दय़ावर खरमरीत उत्तर दिलं आहे.

सोनम क पूर सध्या ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात मल्याळम अभिनेता डुलकेर सलमानबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचा विषयच नशीब किंवा लक फॅ क्टरवर आधारित असल्याने घराणेशाहीचा फॅ क्टर त्यांच्यासाठी कसा आणि किती लकी ठरतो, यावर तिला छेडलं गेलं. यावर कुठलंही थातूरमातूर उत्तर न देता सोनमने घराणेशाही ही एकाअर्थी फायद्याची आणि दुसऱ्या अर्थी तितकीच जबाबदारीची असते, असं स्पष्ट केलं. अर्थात, घराणेशाहीचा फॅ क्टर कलाकारांना चित्रपट हिट होण्यासाठी लकी ठरत नाही हेही तिने ठामपणे सांगितलं.

मला काम मिळावं म्हणून माझ्यासाठी शब्द टाकणं तर दूर माझा फोन नंबरही वडील अनिल कपूर यांनी कोणाला दिला नव्हता, असं तिने सांगितलं. त्यामागचं कारणही तसंच आहे, असं ती म्हणते. अमुक एका कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी म्हटल्यानंतर तुमच्याकडून तुमच्या आईवडिलांसारखीच अभिनयाची अपेक्षा केली जाते. तुम्ही कितीही, कसंही काम केलं तरी अंतिमत: त्याच्याकडे स्वतंत्रपणे पाहण्यापेक्षा आपल्या आईवडिलांच्या कामाशीच त्याची तुलना केली जाणार, याची स्पष्ट जाणीव कलाकारांच्या मुलामुलींनी असते. आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येकालाच आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी लागते, आपल्या चित्रपटांमधून स्वत:ला सिद्ध करावं लागतं, असं सोनमने सांगितलं.

घराणेशाही आणि वारसा या दोन शब्दांतही फार मोठा फरक आहे, याकडेही तिने लक्ष वेधलं. आमच्याकडे आईवडिलांनी निर्माण केलेली अभिनयाची परंपरा आहे, त्यांचा वारसा आहे आणि तो टिकवणं ही आमची जबाबदारीच आहे. त्यामुळे घराणेशाहीचा अर्थ समजून न घेता टीका करणाऱ्यांबद्दल कोणाचेही नाव न घेता सोनमने तीव्र नापसंती व्यक्त केली. सोनमबरोबर या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता मामूटीचा मुलगा डुलकेर सलमान याचीही महत्त्वाची भूमिका आहे. दाक्षिणात्य अभिनेते आपल्यासाठी कायमच लकी ठरले आहेत, असेही सोनमने यावेळी सांगितले. खरे म्हणजे आपल्या कारकीर्दीत सातत्याने वेगवेगळ्या नायकांबरोबर काम करण्यावर भर देणाऱ्या सोनमने अशा प्रकारचे विधान करणे हे आश्चर्याचे वाटू शकते. पण तिच्या मते तिचे सगळेच चित्रपट जवळपास चांगले चालले असले तरी तिचा सर्वात यशस्वी आणि वेगळा चित्रपट ठरला तो ‘रांझना’. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता धनुष हा तिचा नायक होता. आता ‘द झोया फॅ क्टर’मध्येही डुलकेरबरोबर काम करणे तिच्यासाठी लकीच ठरेल, असाही विश्वास तिने व्यक्त केला. अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘द झोया फॅ क्टर’ हा चित्रपट अनुजा चौहान यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर बेतलेला आहे.

आपण एका कलाकाराच्या घरात जन्माला आलो आहोत याचा अभिमानच आहे. कारण हे स्टारडम मिळवण्यासाठी आणि ज्या वातावरणात आपण वाढलो ते देण्यासाठी आपल्या वडिलांनी किती मेहनत केली आहे, याची जाणीव आपल्याला होते. त्यांनी मेहनतीने मिळवलेल्या या स्टारडमचे महत्त्व न ओळखणे, त्यांचा नावलौकिक न जपणे हा एकप्रकारे त्यांनी केलेल्या कष्टांचा अपमानच ठरेल. त्यामुळे वारसा म्हणून जे आपल्याकडे आले आहे ते जपणे हे कर्तव्यच असते, आणि म्हणूनच घराणेशाही ही एकप्रकारे पुढच्या पिढीसाठी मोठी जबाबदारी ठरते.

सोनम कपूर</strong>