नीरजा भानोत या वीरांगणेवर साकारलेल्या ‘नीरजा’ चित्रपटात सोनमने काम केल्याने मला तिचा अभिमान असल्याचे सोनमचे वडील आणि बॉलीवूडचे अभिनेते अनिल कपूर म्हणाले. चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात होत असलेले बदल पाहून आनंद होत असल्याचेही ते पुढे म्हणाले. चित्रपट निर्मिती क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत आहेत. खेळाडूंच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट तयार होऊ लागलेत. नीरजा चित्रपटामुळे खरी नीरजा प्रकाशझोतात आली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी नीरजाने देशासाठी केलेले बलिदान आणि तिची कहाणी कोणालाच माहीत नव्हती. पण या चित्रपटानंतर नीरजाने केलेल्या बलिदानाची जाणीव लोकांना झाली. त्यामुळे चित्रपटात नीराजची भूमिका माझ्या मुलीने केल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
१७ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीच्या(आयआयएफए) घोषणेसाठी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिल कपूर बोलत होते. आयआयएफएचा हा चार दिवसीय सोहळा २३ जून पासून स्पेन येथे होणार आहे. सोनमसोबतच मुलगा हर्षवर्धनचेही अनिल यांनी कौतुक केले. अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन ‘मिर्जा साहिबा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हर्षवर्धनच्या पदार्पणासाठी मी खूप उत्सुक आहे. पदार्पणातच दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्यासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करायला मिळाले म्हणजे हर्षवर्धन खरचं खूप नशिबवान आहे. ७ ऑक्टोबर रोजी हर्षवर्धनचा ‘मिर्जा साहिबा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.