विधू विनोद चोप्रा यांनी ‘१९४२ : अ लव्हस्टोरी’ या चित्रपटात सामाजिक, राजकीय असंतोषाच्या वातावरणात खुलणाऱ्या प्रेमाची कथा मांडली होती. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर चालविण्यासाठी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, राजकुमार राव आणि सोनम कपूर यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनमने नुकतीच एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये सोनमने स्त्रीप्रधान चित्रपटांच्या निर्मितीवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.
सोनम कायमच सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असते. आतापर्यंत सोनमने समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर, खासकरुन महिल्यांवर होणाऱ्या अन्यायावर तिचं मत मांडलं आहे. यावेळी देखील सोनमने चित्रपटसृष्टीतील महिलांच्या स्थानाविषयी तिचं मत व्यक्त केलं आहे.
‘चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र फार कमी चित्रपटांमध्ये अभिनेत्रींच्या वाट्याला मुख्य भूमिका दिल्या गेल्या. त्यामुळे या क्षेत्रात जास्तीत जास्त महिलाप्रधान चित्रपटांची निर्मिती होणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी ‘वीरे दी वेडिंग’, ‘राजी’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटांमध्ये केवळ अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकल्या आणि त्यांनी स्वत: ला सिद्धही केलं’, असं सोनम म्हणाली.
‘सावरियाँ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सोनम बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. तिच्या याच ओळखीसोबत तिने आता बॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. ‘नीरजा’, ‘पॅडमॅन’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केल्यानंतर तिचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. महिल्यांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करणाऱ्या सोनमचा हा चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित असून या चित्रपटातील सोनमची भूमिका वाखाणण्याजोगी आहे.
First Published on February 11, 2019 3:30 pm