अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा सुरू झाला. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होऊ लागली. नामांकित कलाकारांनी घराणेशाहीवर भाष्य केलंय आणि बॉलिवूडमध्ये मक्तेदारी चालते, हे बोलून दाखवलंय. त्यानंतर आता अभिनेत्री सोनम कपूरने ‘फादर्स डे’चं निमित्त साधत घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय.

सोनम ट्विट करत म्हणाली, ‘आज फादर्स डेनिमित्त मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, होय.. मी माझ्या बाबांची मुलगी आहे आणि मी आज ज्या ठिकाणी आहे ते माझ्या बाबांमुळे आहे. होय, मला विशेषाधिकार आहे. हा अपमान नाहीये, मला या सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी माझ्या बाबांनी खूप मेहनत केलीये आणि माझा जन्म कुठे व्हावा, कोणाच्या पोटी व्हावा हे माझं कर्म आहे. मला त्याचा अभिमान आहे.’

आणखी वाचा : सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..

सोनम कपूरच्या प्रत्येक पोस्टच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. त्याचे स्क्रीनशॉटही तिने शेअर केले होते. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवरही जोरदार टीका होऊ लागली आहे. आलिया भट्ट, करण जोहर, सलमान खान या सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट होऊ लागली आहे. या सेलिब्रिटींवर बंदी आणण्याची मोहीमच काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चालवली आहे.