बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बऱ्याच वेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ती उघडपणे व्यक्त होतं असते. याचाच परिणाम म्हणजे तिला अनेक वेळा ट्रोल व्हावं लागतं. परंतु ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ती तिचं मत मांडत असते. यावेळी सोनमने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. देशातील नागरिकांकडे लक्ष देण्यापेक्षा ते त्यांचा वेळ वायफळ बडबड करण्यात घालवत असल्याचं तिने म्हटलं आहे.

संपूर्ण जग सध्या करोना विषाणूच्या विळख्यात सापडलं आहे. चीनपासून फैलावलेल्या करोनाने ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पाय पसरले आहेत. भारत, अमेरिका या मोठ्या देशांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या काळात बऱ्याच वेळा डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील परिस्थिती, त्यांचं मत आणि चीनविषयीचा संताप व्यक्त करत आहेत. यामध्येच ट्रम्प यांनी केलेलं एक वक्तव्य सोनमला पटलं नसून तिने त्यावर तिचं मत मांडलं आहे.

काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याशी निगडीत एक ट्विट केलं होतं. हे ट्विट पाहिल्यानंतर सोनमने संताप व्यक्त केला. ‘अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल. सध्या जगभरात लोकांचे प्राण घेणाऱ्या करोना व्हायरसला नियंत्रित करण्यापेक्षा ते वायफळ गोष्टींवर वेळ व्यर्थ घालवत आहेत’, असं ट्विट सोनमने केलं. सोनमच्या या ट्विटनंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहे.

दरम्यान, ‘मी इंग्लंड आणि महाराणी यांचा चांगला मित्र आणि हितचिंतक आहे. असं म्हटलं जातंय ती प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी राजघराणं सोडून ते कॅनडामध्ये कायमस्वरुपी स्थायिक झाले आहेत. आता त्यांनी अमेरिकेसाठी कॅनडा सोडलं आहे. मात्र ते येथे आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर जो खर्चाचा भार येईल तो आम्ही घेऊ शकत नाही. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था त्यांनाच करावी लागेल’, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं होतं. त्यावर सोनमने संताप व्यक्त केला आहे.