समलिंगी प्रेमसंबंधावर आधारित चित्रपट हॉलिवूडसाठी काही नवी बाब राहिली नसली तरी, आतापर्यंत बॉलिवूडमधील फार कमी चित्रपटकर्त्यांनी या विषयाला हात घालण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. मात्र, बॉलिवूडने आता ‘गे’ प्रेमसंबंधांसारखे विषय हाताळण्याची गरज असल्याचे अभिनेत्री सोनम कपूरने फ्रान्समधील कान येथे सांगितले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत अभिनेत्री सोनम कपूरने भारतात अस्तित्वात असणाऱ्या ‘गे’ कायद्याच्या स्वरूपाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने ‘गे’ नातेसंबंधावरील बंदी योग्य असल्याचा निर्णय दिला होता. याबद्दल बोलताना भारतामध्ये ‘गे’ संबंधांवर असणारी बंदी दुर्देवी  असल्याचे तिने सांगितले. चित्रपटांचे माध्यम हे भारतीय लोकांच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम करणारे असल्याने आगामी काळात ‘गे’ प्रेमसंबंधांवर आधारित चित्रपट तयार केल्यास ‘गे’ लोकांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनात फरक पडू शकतो असे सोनमने सांगितले. तसेच चित्रपटांच्या माध्यमातून ‘गे’ लोकांच्या आयुष्यातील इतर पैलूंवर प्रकाश टाकल्यास कदाचित समाज त्यांना स्विकारेल अशी आशा सोनमला वाटते.