अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या जीवनावर बेतलेला आहे. अरुणाचलम यांनी ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशीनची निर्मिती केली. प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान सोनमने तिला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली, तेव्हाचा अनुभव सांगितला.

‘माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्याआधीच मासिक पाळी आली होती, त्यामुळे मी सुरुवातीला निराश झाली होती. माझ्यात काही कमी आहे का, असा प्रश्न मी आईवडिलांना विचारायचे. पण जेव्हा वयाच्या १५ व्या वर्षी मला पहिल्यांदा पाळी आली, तेव्हा मी खूप खूश झाले,’ असे सोनम म्हणाली. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घेतली जाणारी काळजी आणि त्या दिवसांबद्दल असणाऱ्या काही समजुतींबद्दलही सोनमने काही गोष्टी स्पष्ट केल्या. अनेकांना या दिवसांत आराम करण्यास सांगितले जाते, पण आराम न करता शारीरिक हालचालींकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्याचे तिने सांगितले.

वाचा : ‘उमंग’मध्ये दिसला शाहरुख, रणवीर, दीपिकाचा जलवा

आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत झळकणार असून, अभिनेत्री राधिका आपटेसुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचही आहे. कारण, बिग बी अमिताभ बच्चनही ‘पॅडमॅन’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.