अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या आगामी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट २४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटामध्ये विवेकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. अभिनेता असण्यासोबतच भाजपाचा समर्थक असलेल्या विवेकने सोशल मीडियावर एक मीम शेअर केलं आहे. या मीममुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे केवळ नेटकऱ्यांनीच नाही तर कलाविश्वातील काही कलाकारांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर विवेकने ट्विटरवर एक मीम शेअर केलं होतं. या मीममध्ये तीन फोटो आहेत. हा फोटो शेअर करत एक्झिट पोल कसे असतात? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या फोटोतून त्याने सलमान ऐश्वर्या प्रकरण उकरून काढले आहे. विवेकने शेअर केलेला हा फोटो पाहून अभिनेत्री सोनम कपूर त्याच्यावर चांगलीच संतापली आहे.

“विवेक तू शेअर केलेला फोटो अत्यंत दर्जाहीन आणि तिरस्कार निर्माण करणारा आहे. हे योग्य नाही”, असं म्हणत सोनमने विवेकला फटकारलं आहे. तिच्यासोबतच अन्य काही नेटकऱ्यांनीही त्याला खडे बोल सुनावले आहेत.

दरम्यान, विवेकने ट्विटरवर एक मीम शेअर केलं होतं. यामध्ये पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ‘ओपिनियन पोल’ असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत ‘एक्झिट पोल’ असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली ‘रिझल्ट’ असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर त्याला ट्रोल व्हावे लागले आहे.