बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या कपूर कुटूंबामध्ये सुरु आहे. या धावपळीमध्येच सोनमच्या लग्नाबद्ल रोज नवनवीन खुलासे होत असल्याचे दिसून येत आहे. सोनम तिच्या प्रियकराबरोबर म्हणजेच आनंद अहुजाबरोबर विवाहबद्ध होणार आहे. या वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित राहतील यात शंका नाही.

सोनमच्या लग्नाची तारीख, लग्नसोहळ्यात होणारे रितीरिवाज यांविषयी सर्वत्र चर्चा रंगत असताना आता आणखी एक नवीन गोष्ट समोर आली आहे. सोनम आणि आनंदच्या लग्नसमारंभातील विधी तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा विवाहसोहळा ७ आणि ८ मे या तारखेला होणार असल्याची चर्चा रंगत असून सोनमच्या लग्नाच्या विधी तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. यावेळी संगीत, मेहंदी असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आली असून त्याला पिपिंग चंद्रमा या वेब पोर्टलने दुजोरा दिला आहे.

वाचा: श्रीदेवी यांना भावलं होतं ‘खिचडी’तील ‘हे’ पात्रं 

सोनमच्या मेहंदीचा कार्यक्रम बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘सनटेक सिग्नेचर आईसलॅण्ड’ येथे होणार आहे. तर, संगीत समारंभ पंचतारांकित हॉटेल लिला येथे संपन्न होईल, असेही सांगण्यात आले आहे. बॉलिवूडमधील एक एक कलाकार विवाहबंधनात अडकणार असून सोनमचीही लग्नघटीका समीप आलेली आहे.