‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री सोनम कपूर तिच्या कारकीर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. १९८६ साली कराची येथे हायजॅक करण्यात आलेल्या विमानातील ३५९ प्रवाशांना स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवणाऱ्या हवाईसुंदरी नीरजा भानोत हिच्या भूमिकेत सोनम दिसणार आहे. पहिल्यांदाच चरित्रपटात काम करत असलेल्या सोनमसाठी ‘नीरजा’ची भूमिका अधिक आव्हानात्मक ठरली. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपला अनुभव सांगत असताना नीरजाच्या भूमिकेने एक व्यक्ती म्हणून आपल्याला अधिक कणखर बनवल्याचे सोनमने या वेळी सांगितले.

‘नीरजा’ची भूमिका आपण साकारू शकू की नाही, याबद्दल सुरुवातीला मनात साशंकत होती, असे सोनमने सांगितले. मी एक सर्वसाधारण मुलगी आहे. नीरजाने जे धैर्य दाखवले त्याचा अंशही आपल्यात नाही, असे असताना ही भूमिका कशी साकारायची, असा प्रश्न आपल्याला पडला होता असे ती म्हणाली. मात्र या चित्रपटाची निर्माती शांती शिवराम मैनी यांनी तिची समजूत घातली. नीरजाच्या वरून आयुष्यातही अशी घटना घडली आणि तिने त्याला धीराने तोंड दिले. मात्र या घटनेआधी तीही इतरांसारखीच सर्वसामान्य मुलगी होती. त्यामुळे नीरजाची भूमिका तू चांगली साकारू शकशील, असा विश्वासही मैनी यांनी दिल्याचे तिने सांगितले.

‘तुम्हाला जेव्हा भावनिकदृष्टय़ा एखादी आव्हानात्मक गोष्ट पूर्ण करायची असते तेव्हा एक माणूस म्हणून तुम्ही समृद्ध होता. कुठल्याही परिस्थितीत उत्तम मार्ग कसा काढायचा, तुमच्या अवाक्याबाहेरची गोष्ट करायची असेल तर त्याहूनही चांगलं असं काही तुमच्या हाती लागतं. नीरजा भानोतची भूमिका करताना मला अशीच सकारात्मक ऊर्जा मिळाली. या भूमिकेने मला थकवलं नाही.. उलट अधिक कणखर बनवलं,’ हे सांगताना सोनम भावविवश झाली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने नीरजाच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. ज्या धीराने नीरजाने आपला जीव धोक्यात घालून त्या प्रवाशांचा जीव वाचवला त्या नीरजाची गोष्ट पुन्हा लोकांसमोर आलीच पाहिजे. आपण तिचं देणं लागतो. तिच्या कुटुंबीयांचंही देणं लागतो, असं आपल्याला वाटत असल्याचं सोनमने सांगितलं. नीरजाची तत्त्वनिष्ठा आणि कुटुंबीयांशी असलेलं तिचं घट्ट नातं हा आपल्यातला आणि नीरजातला समान धागा आहे असंही ती पुढे म्हणाली. राम माधवानी दिग्दर्शित ‘नीरजा’ या चित्रपटात सोनमबरोबर अभिनेत्री शबाना आझमी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.