बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक- संगीतकार विशाल ददलानी सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. छोट्या पडद्यावरील इंडियन आयडॉल या कार्यक्रमात चुकीचा इतिहास सांगितल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अलिकडेच इंडियन आयडॉल या कार्यक्रमात एका स्पर्धकाने ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे सादर केले होते. हे गाणं ऐकल्यानंतर विशालने या स्पर्धकाचं कौतूक केलं. सोबतच तिला या गाण्यामागचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, चुकीचा संदर्भ दिल्यामुळे विशालवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं गायिका लता मंगेशकर यांनी १९४७ मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर गायलं होतं, असं विशाल ददलानी म्हणाला. त्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्याला इतिहास नीट पाहण्याचा सल्ला दिला आहे. तर, चुकीचा इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला परिक्षक पदावरुन हटवा असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, झालेल्या प्रकारानंतर विशाल ददलानीने माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- ‘ड्रेस घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते’; कंगनाने शेअर केली ‘ती’ आठवण

दरम्यान, १९६२ मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं होतं. कवी प्रदीप यांनी हिंदीमध्ये हे गाणं लिहिलं असून लता मंगेशकर यांनी २६ जानेवारी १९६३ मध्ये दिल्ली येथे गायलं होतं.