बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक सोनू निगम हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने रक्तदान करताना मास्क न लावल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. पण आता एका कार्यक्रमात सोनू निगमने विनामास्क फिरल्यास आपला चेहरा कधीही भींतीवर टांगला जाऊ शकतो असे म्हटले आहे.

अलिकडेच सोनू निगमने मुलुंडमधील कोविड सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान सोनू निगमने ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. तेव्हा त्याला गेल्या एक ते दीड वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना मास्क लावून फिरत असल्यामुळे स्वत:चा चेहराही दाखवता येत नाही याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर सोनू निगमने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : ‘रक्तदान करताना मास्क लावण्याची परवानगी नाही’, ट्रोल करणाऱ्यांना सोनू निगमचे उत्तर

‘मास्क घातल्यामुळे तुमचा आता अर्धा चेहरा दाखवला जात आहे. पण मास्क घातला नाही तर पूर्ण चेहरा भींतीवरील फ्रेममध्ये दिसेल’ असे सोनू निगम बोलताना दिसत आहे. दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना हसू अनावर झाले आहे.

तसेच सोनू निगम सध्याच्या कठीण काळात कशा प्रकारे काळजी घेत आहे हे देखील सांगितले आहे. ‘मी माझ्या नाकात लिंबाचा रस टाकतो. हळद आणि मीठ पाण्याच्या गुळण्या करतो’ असे सोनू निगमने म्हटले आहे. मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा असे आवाहन देखील सोनू निगमने चाहत्यांना केले आहे.