प्रसिद्ध संगीतकार- गायक अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाल्यानंतर आता गायक सोनू निगमने त्यांची पाठराखण केली आहे. ‘पुरावे नसतानाही आपण आरोप करणाऱ्यांचा आदर करतो, ऐकतो. पण पुराव्यांअभावी त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे,’ असं तो म्हणाला. पार्श्वगायिका सोना मोहपात्रा, श्वेता पंडित यांसोबतच आणखी दोन महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे धक्कादायक आरोप केले आहेत.

‘अजेंडा आज तक’ या कार्यक्रमात सोनू म्हणाला, ‘मी टू मोहिमेवर मला बोलण्याची योग्य संधी मिळाली नव्हती. ताकदीचा कसा गैरवापर केला जातो याचा मी स्वत: साक्षीदार आहे. दहा वर्षांपूर्वी मी सुद्धा ‘मी टू’च्या घटनेला बळी पडलो. एका दिग्दर्शकाला माझ्यासोबत काम केल्यास आत्महत्या करीन अशी धमकी पत्रकाराने दिली होती. त्या पत्रकाराने मला खूप त्रास दिला.’

Thackeray Biopic: चर्चा फक्त भगव्याची अन् नवाजुद्दीनच्या लूकची

‘अनु मलिक यांच्यावर तुम्ही पुराव्यांशिवाय आरोप करत आहात. या आरोपांवर ते खूप काही बोलू शकत होते. पण त्यांनी तसं नाही केलं. तुम्ही माझ्याशी गैरवर्तन केलं असा आरोप जर मी करत असेन तर निश्चितच तुम्ही आधी पुरावे मागणार. पण पुरावेच नाहीत. असं असतानाही अनु मलिक यांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांचा लोक आदर करत आहेत. तुम्ही हे कसं थांबवू शकता? अनु मलिक यांची रोजीरोटी तुम्ही कशी हिसकावून घेऊ शकता? त्यांच्या कुटुंबीयांना त्रास कसा देऊ शकता,’ असे प्रश्न सोनू निगमने उपस्थित केले.

केवळ आरोपांमुळे एखाद्याकडून त्याचं काम काढून घेणं योग्य नाही असं मत सोनूने मांडलं. ‘तुम्ही त्यांच्यावर आरोप केले, त्यांची प्रतिमा मलिन केली. आता किमान त्यांच्या कुटुंबीयांना तरी त्याची शिक्षा देऊ नका. आधी पुरावे समोर आणा मग बोला,’ अशा शब्दांत सोनूने आरोप करणाऱ्यांना सुनावले. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत झालेल्या आरोपांनंतर अनु मलिक यांना ‘इंडियन आयडॉल १०’चे परीक्षकपद सोडावं लागलं.