करोना काळात लोकांच्या मदतीसाठी गायक सोनू निगम पुढे आला आहे. नुकताच मुंबईतल्या जुहू इथे आदर्श फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यासाठी सोनू निगम गेला होता. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर त्याने स्वतः पुढाकार घेत रक्तदान ही केले. इतकंच नाही तर त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आणि करोना लस घेण्याअगोदर रक्तदान ही करा, असे आवाहन देखील त्याने केले होते. पण रक्तदान करताना मास्क न लावल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता त्याने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

रक्तदान करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सोनू निगमला ट्रोल करण्यात आले होते. एका यूजरने सोनू निगम शो ऑफ करतोय असे म्हटले तर दुसऱ्या एका युजरने ‘कुणीतरी मास्क दान करा’ अशी कमेंट करत सोनू निगमला ट्रोल केले. ते पाहून आता सोनू निगमने ट्रोलर्सला सुनावले आहे.

आणखी वाचा : लग्नाच्या वाढदिवशी करोना पॉझिटिव्ह, सुव्रत म्हणतो ‘अनोखी भेट’

‘जे लोकं आइनस्टाइन बनले आहेत त्यांना मी त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ इच्छितो. मूर्ख लोकांनो रक्तदान करताना मास्क लावण्याची परवानगी नाही. आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहात?’ या आशयाची कमेंट करत सोनू निगमने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच सोनू निगमला करोना झाला होता. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत करोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ही त्याने रक्तदान करताना मास्क लावले नसल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. आता त्याने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.