करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झालेला असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरूवात झाली होती. कुंभमेळ्यामुळे देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती सातत्यानं व्यक्त केली गेली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात करण्याचं आवाहन केलं. आता कुंभमेळ्याच्या आयोजनावरून गायक सोनू निगमने नाराजी व्यक्त केली आहे.

सोनू निगमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, करोनाच्या काळात कुंभमेळा आयोजित करायला नको होता, असं म्हटलं आहे. “मी दुसऱ्यांविषयी काही म्हणू शकत नाही. पण, एक हिंदू म्हणून हे निश्चितच सांगू शकतो की, कुंभमेळा व्हायला नको होता. असो चांगलं झालं थोडी सुबुद्धी झाली आणि याला प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलं. मी श्रद्धा समजू शकतो. पण, मला वाटतं सध्या लोकांच्या जिवांपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीही नाही,” असं सोनूनं म्हटलं आहे.

“आमची कार्यक्रम करण्याची इच्छा होत नाही, असं तुम्हाला वाटतं का? पण मला वाटत की कार्यक्रम व्हायला नको. एक गायक म्हणून हे सांगतोय. कदाचित सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल, असे कार्यक्रम होऊ शकतात. पण, परिस्थिती खूप खराब आहे. आपण हे समजून घ्यायला हवं. सव्वा वर्षापासून लोकांच्या हाताला काम नाहीये, पण करोनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. माझी पत्नीही करोनाशी लढा देत आहे,” असंही सोनू निगमने म्हटलं आहे.

सोनू निगमने कुंभमेळ्याच्या आयोजनावर भूमिका मांडण्याआधी अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील कुंभमेळ्यातील गर्दीवर आणि त्यातील करोना उद्रेकावर आपलं मत मांडलं होतं. इन्स्टाग्रामवर कुंभमेळ्यातील छायाचित्र शेअर करताना तिने लिहिलं होतं की, ‘हे महामारीचं युग आहे, पण हे खूप धक्कादायक आहे.’ मलायका व्यतिरिक्त दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही नाराजी व्यक्त केली होती. “लोक आपलं कर्म धुण्यासाठी गंगेमध्ये डुबकी घेत आहेत आणि त्यांना आशीर्वादात करोना मिळत आहे,” असं परखड मत वर्मांनी व्यक्त केलं होतं.