करोना काळात अभिनेता सोनू सूद सध्या गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला आहे. एकीकडे देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत सोनू सूद लागोपाठ लोकांची मदत करतोय. यासाठी त्याने ‘सोनू सूद फाऊंडेशनची स्थापना केली आणि त्या माध्यमातून लोकांना ऑक्सिजन सिलेंडर्सपासून सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देतोय. त्याच्या या फाऊंडेशनला एका दिव्यांग मुलीने मदत केलीय. तीने केलेली मदत पाहून सोनू सूदने तिला ‘सगळ्यात श्रीमंत व्यक्ती’ असं म्हटलंय.

लोकांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूदची सुरू असलेली धडपड पाहून आतापर्यंत खूप जणांनी त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मदत केली आहे. परंतू एका दिव्यांग मुलीने केलेली ही मदत पाहून सोनू सूद अगदी भारावून गेला. या दिव्यांग मुलीने तिची तब्बल ५ महिन्यांची पेन्शन सोनू सूद फाऊंडेशनला दान केली आहे. सोनू सूदने ट्विट करत या दिव्यांग मुलीच्या अनोख्या मदतीसाठी तिचं कौतूक केलंय. या दिव्यांग मुलीचा फोटो शेअर करत सोनू सूदने या मुलीला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असं म्हटलंय.

अभिनेता सोनू सूदने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं, “बोड्डू नागा लक्ष्मी, एक दिव्यांग मुलगी आणि यूट्यूबर…या आंध्र प्रदेशमधल्या एक छोट गाव  Varikuntapadu मध्ये राहतेय…त्यांनी सोनू सूद फाऊंडेशनला १५००० रूपयांचे दान केलंय…ही रक्कम त्यांची पाच महिन्यांची पेन्शन आहे…माझ्यासाठी या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत…तुम्हाला लोकांचं दुःख बघण्यासाठी डोळ्यांची गरजच असते असं नाही…एक खरे हिरो…”

या दिव्यांग मुलीने केलेल्या मदतीनंतर अनेक जणांनी सोनू सूदला मदत करण्यासाठी सुरवात केली आहे. सोनू सूद त्याच्या फाऊंडेशनला मदत मिळवण्यासाठी लागोपाठ धडपड करतोय. त्याला जितकं शक्य होईल तितकं तो लोकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांचीच तो मदत करताना दिसून येतोय. नुकतीच क्रिकेटर हरभजन सिंहने रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सोनू सूदकडे मदत मागितली होती. क्रिकेटर हरभजन सिंहला देखील सोनू सूदने ताबडतोब मदत पुरवली होती.