करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतंच त्याने झारखंडमधील ५० तरुणींना नोकरी मिळवून देण्याचं वचन दिलं आहे. परिणामी सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अवश्य पाहा – १० कलाकार अन् दिवस १००; पाहा ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक

“आम्ही झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात राहतो. लॉकडाउनमुळे आमच्या गावातील ५० तरुणींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या मुली सध्या बेरोजगार आहेत. कृपया नोकरी मिळवून देण्यासाठी आपण मदत करावी.” अशा आशयाचं ट्विट करुन या तरुणींनी सोनूकडे मदत मागितली होती. त्याने देखील त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत नोकरी मिळवून देण्याचं वचन त्यांना दिलं आहे. “धनबादमधील माझ्या ५० बहिणींना मी एका आठवड्यात नोकरी मिळवून देईन.” अशा आशयाचं ट्विट सोनू सूदने केलं आहे. त्याच्या या ट्विटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.